नाशिक ग्रामीणशेती

कांदा उत्पादकांच्या सुखी संसारासाठी कांदा चाळीची महापूजा


वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : कसमादे परिसरात कांदा हे नगदी पीक म्हणून घेतले जाते. येथील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित हे पूर्णतः कांदा पिकावर अवलंबून असते. त्यामुळे कांदा बाजारभावात सुधारणा होऊन बळीराज्याच्या हातात दोन पैसे यावे यासाठी देवळा तालुक्यातील वाजगाव येथील शेतकरी प्रेमानंद आनंदराव देवरे यांनी आपल्या साठवणूक केलेल्या कांदा चाळीत महापूजा आयोजित केली होती.

कांदा कधी कुणाला रडवेल आणि कुणाला हसवेल हे काही सांगता येत नाही. याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील सर्वांना आला. खरंतर कांद्याचा सर्वच अगदी आवडीने आपल्या आहारात वापर करत असतात. मात्र, पिकवणाऱ्याचा आहारच याच्या मूल्यावर आधीरत असतो. त्याचे मूल्य घसरले की कांदा उत्पादकांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडते.  मुलांचे शिक्षण, दवाखाना, अंगावर घालायचे कपडे असो किंवा घरातील सुख, दुःखाचे कार्य असो या सगळ्या गोष्टींवर याचा परिणाम लगेच दिसून येतो.

कांदा पिकाची रोपवाटिका ते बाजार समितीत मालाची विक्री हे चक्र पूर्ण होत असतांना केलेले कष्ट, पैशांची जुळवाजुळव करून केलेला खर्च निघेल का? कष्ट सार्थकी लागतील का? याची चिंता प्रत्येक क्षणाला या उत्पादकांना असते. यातच कधी निसर्गाचा कोप झाला किंवा यंत्रणेने हस्तक्षेप करून बाजारभाव पाडले की पुन्हा कर्जबाजारी होणे हे कांदा उत्पादकांचे नित्याचेच  झाले आहे.

कधी कांद्याचे थोडेफार भाव वाढलेच तर खाणाऱ्यांचा आधी विचार केला जातो. मात्र तो उत्पादीत करतांना ट्रॅक्टर ला लागणारे डीझल वाढलं, मजुरी वाढली, औषधे वाढली, खते महागली याचा विचार दूरपर्यंत कुणीच करत नाही. उत्पादकांनी घर प्रपंच कसा चालवले कर्जाची परतफेड कशी करेल हे कुणाच्या मणी देखील येत नाही हे दुर्दैवच.

चालू वर्षी तर या पिकावर दुष्काळाचे सावट असल्याने मोठ्या मेहनतीने कांदा पिकवला गेला. पाण्याअभावी अनेकांनी अर्ध्यावर पीक सोडले, काहींनी विक्रीचे पाणी आणून पीक जगवल, त्यात शेवटच्या टप्प्यात निसर्ग कोपला आणि पीक करप्याला बळी पडले. यामुळे फवारणीचा खर्च तर वाढलाच सोबत अनेक ठिकाणी उत्पादनात मोठी घट आली.  वरील अडचणींनीचा सामना करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च आल्याने सद्यस्थितीत मिळत असलेला भाव देखील फक्त उत्पादन खर्च काढत असून, अद्याप हातात खर्च सोडून पैसा मिळत नाही आहे. त्यामुळे माझ्या बळीराज्याला सुखाने दोन घास खाण्यासाठी, त्याचे डोक्यावरील कर्ज खांद्यावर  येण्यासाठी, मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी, आरोग्यासाठी, निराशेतून बाहेर येण्यासाठी, कांद्याला चांगला बाजारभाव मिळावा, बाजारभावात वाढ व्हावी, यासाठी  वाजगाव येथील  तरुण शेतकरी प्रेमानंद आनंदराव देवरे यांनी आपल्या कांदा चाळीत महापूजा आयोजित केली.

प्रेमानंद  देवरे यांचे मोठे बंधू लक्ष्मण देवरे यांनी सहपत्नी ही विधिवत पूजा केली यासोबत त्यांचे कुटुंबीय, भाऊबंद, मित्रपरिवार, कांदा उत्पादक  रामदास देवरे, विठोबा देवरे, भास्कर देवरे, आनंदराव देवरे, किरण देवरे, महेंद्र देवरे, गोविंदा देवरे, शुभानंद देवरे, सागर देवरे, तुषार देवरे, गोविंदा देवरे, सनी देवरे, कुणाल देवरे, संकेत गायकवाड, अजय देवरे, दर्शन देवरे, आदित्य देवरे, चेतन देवरे, मानस शुभानंद देवरे आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बाबा पवार

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!