नाशिक ग्रामीण

रात्री धुमधडक्यात वाढदिवस झाला, अन.. पहाटे साप चावला


वेगवान नाशिक / मनोज शिंदे

बागलाण, ता. 25 जून 24 – वटार येथील माजी सरपंचांच्या तीन वर्षीय एकुलत्या एक नातुला सोमवारी(दि.२४) पहाटे झोपेतच सर्पदंश झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.येथून जवळच असलेल्या विरगाव आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला असून रात्री तिसरा वाढदिवस साजरा केल्यानंतर पहाटेच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कृषी कर्जमाफीने धरला जोर, राज्यात कर्जमाफीला पोषक वातावरण?

वटार येथील माजी सरपंच ज्ञानदेव खैरनार यांचा तीन वर्षीय नातू स्वराज सागर खैरनार हा डोंगरेज शिवारातील शेतातील राहत्या घरात झोपला होता.पहाटेच्या सुमारास तो अचानक जोराने रडल्याने पालकांना जाग आली.त्यावेळी त्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात आले.त्यानुसार तात्काळ त्यास वाहनाने जवळील विरगाव आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेण्यात आले.परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते.तसेच इतर अनुषंगिक उपचारासाठी आवश्यक सोयी सुविधा नसल्याचे सांगून त्यास सटाणा येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. तोपर्यंत शुद्धीवर असलेला स्वराज सटाणा येथे जाताना मात्र बेशुद्ध झाला आणि सटाणा रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू ओढवला.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

रेल्वेच्या ​या विशेष प्रवासी गाड्यांचा कालावधीत वाढ

रात्री वाढदिवस सकाळी अंत्यविधी…दुर्दैवी स्वराज्याचा रविवारी (दि.२३)रात्री मोठ्या थाटामाटात तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी उपस्थित राहून त्यास शुभाशीर्वाद दिले.परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच असावे.वाढदिवस साजरा झाल्यानंतर काही तासातच पहाटे चार वाजेच्या पूर्वी त्यास सर्पदंश झाला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.सकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.साहाजिकच यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.)

(सर्प पकडण्यात यश..स्वराजला दंश करणारा सर्प त्याच खोलीत दडून बसला होता.त्यामुळे सर्पमित्र देवा वाघ यास बोलावण्यात आले.त्याने स्वराज झोपलेल्या पलंगाखालीच दडून बसलेल्या सर्पला पकडले.तो अति विषारी पहाडी नाग असल्याचे लक्षात आले.त्यास शिताफीने पकडून जंगल परिसरात सोडण्यात आले.

माजी आमदारांची भेट,

आरोग्य यंत्रणेबाबत नाराजी..स्वराजच्या दुर्दैवी निधनाबद्दल माहिती होताच सकाळी अंत्यविधीप्रसंगी माजी आमदार संजय चव्हाण यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.त्यानंतर दुपारून माजी आमदार दीपिका चव्हाण यांनीही कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.यावेळी कुटुंबीयांनी विरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.तसेच याबाबत १०४ क्रमांकावर तक्रारही करण्यात आली.घटनेनंतर महसूल विभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन घटनेबाबत माहिती घेतली.परंतु सायंकाळपर्यंत आरोग्य विभागाचे कोणीही या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले नव्हते.यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून वेळेवर योग्य औषधोपचार आणि सुविधा मिळाली असती तर एकुलत्या एक स्वराजचे प्राण वाचले असते अशी भावना व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!