या भागातील वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने सर्वसामान्य ग्राहक त्रस्त
देवळालीत वारंवार होतोय वीज पुरवठा खंडित सावळा गोंधळ थांबविण्याची मागणी
- वेगवान नाशिक /Wegwan Nashik
देवळाली कॅम्प, ता.24 जून 2024 देवळाली शहराच्या विविध भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून यामुळे नागरिकांची विजेवर चालणारी विविध उपकरणे मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे. त्यामुळे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनी तत्पर असली तरी मागील काही दिवसात वीज ये-जा होण्याचे प्रमाण वाढीस लागल्याने देवळालीच्या वीज वितरण कार्यालयाच्या कारभाराविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
मागील दोन आठवड्यांपासून दिवसा-रात्री अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामागे वारंवार वीज तारा योग्यप्रमाणात ओढलेल्या नसणे,पशु पशुपक्षांमुळे होणारे प्रकार, डीपी व वीज वाहिनी पोलवर प्रसंगी नादुरुस्ती अशी एक ना अनेक कारणे आहेत. वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत विचारणा करायला गेलेल्या ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.
रात्रीच्या वेळी तर कार्यालयात कोणीच राहत नसल्याचे दिसून आले आहे. संबंधित कार्यालयाकडून दिलेले दूरध्वनी व मोबाईल क्रमांक हे देखील सतत बंद रहातात. लागलाच फोन तर उध्दटपणे उत्तरे दिली जातात किंवा जाणीवपूर्वक स्वीच ऑफ केले जातात. याप्रकरणी वीज वितरण विभागाचा वरिष्ठ कार्यालयाने देवळाली कॅम्प परिसरात सुरू असलेला हा सावळा गोंधळ थांबवावा, अशी मागणी सर्वसामान्य ग्राहक वर्गातून केली जाते.
ग्राहकांना माहिती देण्यासाठी हवी यंत्रणा
हल्ली समाजमाध्यमांमध्ये व्हाटसअँप,टेलिग्रामसारख्या क्षणात माहिती पोहोचविणाऱ्या सुविधा उपलब्ध असताना या सुविधांचा वापर ग्राहकांपर्यंत वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर त्यामागील कारणे व उपाययोजना करण्यासाठी लागणारा वेळ याबाबतची माहिती पोहचविण्यासाठी या माध्यमांचा वापर करणे गरजेचे आहे. यामुळे ग्राहकांमधील संताप कमी होण्यास मदत होईल.
तरीही वीजपुरवठा सुरळीत नाही
मागील महिन्यात भर उन्हाळ्यामध्ये वीज वाहिन्या दुरुस्त व वाहिन्यांवरील अडथळे दूर करण्यासाठी आठ ते दहा तास वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. याकामी खाजगी ठेकेदारांना हजारो रुपये मोजले जातात तरी देखील वीजपुरवठा सुरळीत होत नाही. मग त्या हजारो रुपये खर्च होऊन उपयोग काय ? ही वीज वितरण कंपनीसाठी लाजिरवाणी बाब आहे. त्यातच गेल्या चार महिन्यांपासून वीज शुल्कात भरमसाठ वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहक वाढत्या वीज बिलाने त्रस्त झाला आहे. या विरोधात मात्र कोणीही काहीही बोलत नाही.
१) सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ग्राहक वर्ग त्रासला आहे त्यात वीजबिलात सतत वाढ होतेच आहे तरी देखील ग्राहक या वीज वितरण कंपनीच्या कारभाराविषयी समाधानी नाही
– नवनाथ झोंबाड, नागरीक
२) आम्ही स्थानिक पातळीवरील कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर लागलीच दुरुस्त करत असतो. कधी कधी वीज थेट एकलहरा येथून बंद झाल्यास आमचा नाईलाज होतो.
संदीप चव्हाण,कनिष्ठ अभियंता, देवळाली कॅम्प