नाशिक शहर
संत निवृत्तीनाथ पालखी दुपारच्या विसाव्यासाठी मुक्तिधाममध्ये
हजारो वारकऱ्यांसह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित

Wegwan Nashik/वेगवान नाशिक. २३ जून, नाशिकरोड :-
वारकरी संप्रदायाची परंपरा असलेली संत निवृत्तीनाथ संस्थानच्या वतीने पंढरीच्या दिशेने निघालेला पालखी सोहळा काल रविवार दि.२३ रोजी दुपारच्या विसाव्यासाठी मुक्तिधाम येथे दाखल झाला होता.
विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेले वारकरी व संत निवृत्तीनाथ पालखीचे बिटको चौकात आगमन झाले त्यावेळी हजारो वारकऱ्यांचे पायी चालतांना पाहतांना सर्व वाहतूक एकाच जागी स्तब्ध उभी राहिल्याचे चित्र दिसून आले. रस्त्यावर जागोजागी रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या. पिढ्यांपिढ्यांची असलेली परंपरा जोपासत, खांद्यावर पताका, हाती असलेल्या टाळांचा गजर करीत मुखाने विठ्ठलानाम घेत असलेले वारकरी तर डोक्यावर तुळस व मंगल कलश घेतलेल्या माता भगिनींची रस्त्याने वर्दळ पाहायला मिळाली. पालखी मुक्तिधामच्या मागील प्रवेशद्वाराकडून प्रांगणात आगमन होताच संबंध वारकऱ्यांनी संत निवृत्तीनाथ महाराज व विठ्ठलाच्या नामाचा एकच जयघोष केला. मुक्तिधाम मंदिराच्या विश्वस्थ जगदीश चौहान यांनी संत रथातील पादुका डोक्यावर घेत मुख्य गाभाऱ्यात असलेल्या प्रभू रामचंद्रासमोर पादुका ठेवत हभप जयंत महाराज गोसावी यांच्या पौरोहित्याखाली सुवर्णा व जगदीश चौहान यांनी पंचोपचार व पाद्यपूजा केली.
यावेळी द्वाराचार्य रामकृष्णदास महाराज लहवितकर,संस्थानच्या अध्यक्षा कांचन जगताप, माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, निलेश गाढवे, पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ, मोहनशेठ चौहान, दिनकर आढाव, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, राज्य कर अधिकारी गणेश गाढवे, निवृत्तीमामा जाधव, बाळासाहेब म्हस्के, आर.डी.धोंगडे, सूर्यकांत लवटे, सुरेश शेटे,जगदीश गोडसे, शिवाजी हांडोरे, मंगेश लांडगे आदींसह नाशिकरोड पंचक्रोशीतील विविध मान्यवर उपस्थित होते. सर्व वारकऱ्यांना मुक्तिधाम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भोजन दिले. नाशिकरोड व उपनगर पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
