नाशिक क्राईम
पतीच्या निधनानंतर सातव्याच दिवशी पत्नीचीही आत्महत्या
देवळाली कॅम्पच्या आडके नगर येथील प्रकार

Wegwan Nashik/ Wegwan Nashik ,२१ जून-
देवळाली कॅम्प :- येथील आडके नगर परिसरात राहणाऱ्या आश्विनी योगेश हाबडे (३६) हिने आज शुक्रवार दि. २१ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सात दिवसांपूर्वी तिचा पती योगेश अशोक हाबडे (४०) याने पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणानंतर टोकाचे पाऊल उचलत शुक्रवार दि.१४ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास योगेशची पत्नी आश्विनी हाबडे (३६) हिने देखील ओढणीला लटकून घेत त्याच घरातील बेडरुमधे आत्महत्या केली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांनी आश्विनीस कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल केले असता कर्तव्यावर असलेले डॉ. नरेश दौलतानी यांनी तिला मयत घोषित केले. पोलिसांसह नातेवाईकांनी तिचे शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.
