सरकारी माहिती

विद्यार्थ्यांसाठी एसटी राबवतेय ही विशेष योजना

गाव तिथे एसटी, शाळा तिथे पास


Wegwan Nashik/ वेगवान नाशिक, २१ जून- 

    महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीतर्फे अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांच्या सेवेसाठी विविध योजना राबविल्या जातात. गेल्या काही वर्षात एसटी महामंडळाने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ‘ एसटी पास थेट तुमच्या शाळेत ‘ हि विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या कल्याणाची योजना राबवली आहे.

शालेय विद्यार्थ्यांतर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर एसटीची प्रवास सवतलतीचे पास घेतले जातात. बस स्थानकातील नियंत्रण कक्षात पास काढण्यासाठी लागणाऱ्या दीर्घ रांगा आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा होणारा खोळंबा टाळण्यासाठी आता बसचे पासेस थेट शाळांमध्येच वितरीत करण्याचा निर्णय आता एसटी शासनाने घेतला आहे.  महामंडळाच्या या उपक्रमास शालेय विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद लाभत असून शाळेच्या शिक्षकांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.

नाशिक विभागातील पंचवटी आगाराच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या त्र्यंबकेश्वर, आंबोली, हरसूल, पिंपळद अशा अनेक गावांमध्ये आगाराचे वाहतूक पर्यवेक्षक जाऊन शाळांमध्ये या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे. विद्यार्थ्यांची परवड थांबविल्याबद्दल नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

शालेय विद्यार्थी – विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच शाळा प्रशासनाने आगार प्रशासनाशी संपर्क साधून इच्छुक विद्यार्थ्यांची यादी सादर करावी असे आवाहन नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, यंत्र अभियंता श्रावण सोनवणे, आगार व्यवस्थापक (व) कल्याणी ढगे, आगार व्यवस्थापक (क) सौरभ रत्नपारखी यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!