नाशिक शहर
देवळालीकरांना नवनिर्वाचित खासदार वाजेंनी काय दिले आश्वासन
कॅन्टोन्मेंट बोर्ड अध्यक्षांसह महाविकास आघाडीकडून स्वागत
देवळालीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध
वेगवान नाशिक/ WEGWAN NASHIK, १८ जून,देवळाली कॅम्प:-
देवळाली कॅम्प शहर हे लष्करी भागासह विविध जाती-धर्मिय एकत्र व गुण्यागोविंदाने नांदणारे शहर असून या शहराच्या नागरिकांच्या अडचणी सोडविण्याकामी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले.
निवडणुकीनंतर प्रथमच देवळाली कॅम्प येथे खासदार राजाभाऊ वाजे यांनी भेट दिली. जुन्या बस स्थानक येथे आमदार योगेश घोलप यांच्या संपर्क कार्यालयाजवळ ढोलताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडून सत्कार स्वीकारला.
याप्रसंगी माजी आमदार योगेश घोलप,पांढुर्लीचे माजी सरपंच कैलास वाजे, काँग्रेसचे ऍड. अशोक आडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोमनाथ खातळे, शिवसेनेचे उबाठा गटाचे बाळासाहेब गोडसे, पोपटराव जाधव, दिनकर पाळदे, तालुका संघटक साहेबराव चौधरी, विधानसभा संघटक वैभव पाळदे, शहरप्रमुख गोकुळ मोजाड, विलास गीते, प्रमोद मोजाड, विलास संगमनेरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
येथील सामाजिक संघटना असलेल्या सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी शिष्टमंडळासह आपण खासदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष भारत वाघमारे यांनी सांगितले.
त्यानंतर येथील लामरोडवर राहणारे सुप्रसिद्ध उद्योजक दानशूर व्यक्ती महाराज कृष्ण बिरमानी यांच्या कार्याविषयी माहिती असल्याने त्यांनी त्यांची भेट घेत तब्येतीची देखील चौकशी केली.त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष असलेले कंमाडंट इन चीफ कार्यालयात ब्रिगेडियर आशिष भारद्वाज यांची भेट घेतली.
याप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आपण दिल्ली दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी ब्रिगेडियर आशिष भारद्वाज,नामनिर्देशित सदस्या प्रीतम आढाव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गजभिये यांना दिले. याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड उपस्थित होते.