- वेगवान नाशिक/ नाशिक:, नितीन चव्हाण ता:, १६ जून २०२४
शहरातील म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे.
गेल्या पंधरा दिवसांत ही शहरातील दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी पंचवटीतील कर्णनगर परिसरात एका युवकाची त्याच्याच मित्रांनी मागील भांडणाची कुरापत काढून खून केल्याची घटना घडली होती.
त्यानंतर आज पुन्हा एकदा म्हसरूळ परिसरात एका युवकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत अशोक तोडकर (वय २८) रा. आदर्शनगर, रामवाडी असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
सदर युवक हा रिक्षाचालक चालक असून तो सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता.
सदर युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे बोलले जात असून शनिवारी दिवसभर हा युवक घरी होता.
पंरतु, रात्री तो घराबाहेर पडला होता, अशी माहिती समोर आली आहे.
त्यानंतर आज सकाळी आठ वाजता मयत युवकाच्या भावाला पोलिसांकडून त्याचा खून झाल्याची घटना समजली.
सदर युवकाच्या पश्चात दोन भाऊ, एक बहिण आणि आई वडील असा परिवार आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, म्हसरूळ पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.