वेगवान नाशिक /नाशिक नितिन चव्हाण ता;, १२ जुन २०२४
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्याच्या मुद्द्यावरून अंतरवाली सराटी येथे आंदोलनास बसून पुन्हा एकदा ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरू केल्याने त्याला शह देण्यासाठी तसेच ओबीसी बारा बलुतेदारांच्या विविध मागण्या मार्गी लागाव्यात या मागणीसाठी 13 जून पासून गोल्फ क्लब मैदानावर उपोषणास बसण्याचा इशारा ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी एका पत्रकानव्ये दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे गुढच कुणाला उकलत नाही.मराठा आंदोलन समितीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवारांना उभे करण्याची वल्गना त्यांनी केली होती मात्र त्यांनी ती काही काळातच मागे घेतली.
सर्वच मतदार संघात बहुसंख्य ठिकाणी मराठा उमेदवार उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर या उमेदवारांच्या मतांवर काही परिणाम होऊ नये म्हणून जरांगे पाटील यांनी घुमजावचा निर्णय घेतला ही गोष्ट लपून राहिलेली नाही.
पंकजा मुंडे,महादेव जानकरसह अनेक ओबीसी नेत्यांना पाडण्यात तसेच ओबीसींचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांचे तिकीट कापण्यात आम्ही यशस्वी झालो अशी डरकाळी फोडून जरांगे पाटील स्वतःची पाठ थोपटून घेत असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा कावेबाजपणा आम्ही निश्चित हाणून पाडू.
विधानसभा निवडणुकीत जनरल जागांवर खऱ्या ओबीसींना म्हणजे बारा बलुतेदारांना जास्तीत जास्त तिकिटे मिळावीत अशी आमची प्रमुख मागणी राहील.
या जागांवरएका विशिष्ट समाजाचे असलेले वर्चस्व यापुढे आम्ही खपवून घेणार नाही,असा इशाराही गजू घोडके यांनी पत्रकात दिला आहे.
ओबीसींच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठीच तेरा जूनपासूनचे आपलं आंदोलन असेल, याची आठवणही घोडके यांनी पत्रकात करून दिली आहे.