नेहमी संतांवर विश्वास ठेवावा जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज
नेहमी संतांवर विश्वास ठेवावा जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज

वेगवान नाशिक /नाशिक नितिन चव्हाण ता;, १२ जुन २०२४
संत पृथ्वीतलावर परमेश्वराच्या रूपाने आलेले आहेत आणि ते आपल्याला जागं करत आहेत.
तुम्ही किती वर्ष जगणार आहात हे माहीत नाही, त्यामुळे त्याच्या अगोदर जीवनाची पूर्तता करावी यासाठी संतांना पाठवण्यात आले आहेत.
ते आपल्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे काम करतात. जे त्यांच्यावर विश्वास ठेवतात ते तरतात, जे विश्वास ठेवत नाही त्यांना त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे नेहमी संतांवर विश्वास ठेवावा असे अनमोल विचार अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी भक्तांना मार्गदर्शन करताना मांडले.
जनम संस्थानाच्या वतीने आशेवाडी येथील उत्तर महाराष्ट्र उपपिठात जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रवचन दर्शन व समस्या मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने संस्थानाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले .
आदिवासी नृत्याने स्वागताच्या कार्यक्रमाला बहर आणली. दिवसभर अनेक भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
तसेच जीवनात येणाऱ्या समस्यांच्या बाबतीत जगद्गुरु श्रींनी यावेळी मार्गदर्शन केले.
भक्तांना मार्गदर्शन करताना जगद्गुरु श्री म्हणाले की, जीवनात गुरूंनी सांगायचे आणि आपण ऐकायचे. याचे भक्तीचे नाव आहे दास्यभक्ती .दास्य भक्तीमध्ये स्वामी मालक असतो आणि आपण त्यांचं ऐकायचं असतं.
दास्य भक्ती करूनच मोठमोठे साधुसंत तयार झाले आहेत. देवाला शोधायला बाहेर जाण्याची गरज नाही.
देवावर पूर्ण विश्वास ठेवावा ,त्याने जन्माचे सार्थक होईल .यासाठी परमार्थ करावा लागतो. संसार त्याग न करता परमार्थ साधता येतो.
हा जन्म का मिळाला याचा योग्य प्रकारे विचार करून त्याचे उत्तर शोधले पाहिजे. मनुष्य जन्म हा मुक्ती मिळवण्यासाठी मिळालेला आहे.
मुक्ती म्हणजे अज्ञानापासून सुटका. स्वतःला स्वतःची किंमत कळली पाहिजे. या देहाला जपलं पाहिजे, जोपासले पाहिजे.
हा देह आहे तोपर्यंत सर्व करता येईल. चांगल्या कर्माचे फळ म्हणजे मनुष्य जन्म आहे. जीवन हे अनमोल हिऱ्यासारखे आहे, परंतु आपल्याला आपली किंमत कळलेली नाही.
त्याची किंमत कळण्यासाठी रत्नपारख्याकडे जावं लागतं, ते म्हणजे सद्गुरु. त्यासाठी सद्गुरु नेहमी भक्तांना मार्गदर्शन करत असतात.
अनमोल देहाचे कल्याण करायचे असेल तर स्वतःची किंमत करायला शिका .याचेच नाव परमार्थ असल्याचे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सांगितले.
