देवळा तालुक्यात पावसामुळे कोट्यावधीचं नुकसान,दोघांचा मृत्यू
देवळा तालुक्यात पावसामुळे कोट्यावधीचं नुकसान,दोघांचा मृत्यू

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : दि. १० काल देवळा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने तालुक्यातील पूर्व भागाला जोरदार तडाखा बसला आहे. या पावसाने दोघांचा जीव घेतला असून एक बैल देखील ठार झाला आहे. तसेच २० ते २५ कांदा शेड वादळी वाऱ्याने उडाले व शेड मधील कांदा वाहून गेल्याने करोडो रुपयाचे नुकसान झाले.
दि. ९ रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने अनेक व्यापारी व शेतकरी यांचे कांद्याचे शेड उडून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर फेकले गेले.
कांदा व्यापारी ए. बी. पी. आडत कंपनीचे अनुप बाबुराव पवार यांच्या तिसगाव रोडवरील कांद्याच्या शेडखाली पाऊस आल्याने उमराणे येथून घरी जात असताना तिसगाव येथील शेतकरी भाऊराव आहेर हे पत्नी मुलगा थांबलेले होते, वादळामुळे अचानक अंगावर कांद्याच्या शेड पडून डोळ्या समोरच मुलगा देविदास आहेर वय ३७ याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तसेच तिसगाव येथील शेतकरी आकाश शरद देवरे याचा बैल बांधताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला व बैलही ठार झाला. तर शेतकरी देवराम त्र्यंबक देवरे यांच्या शेतातील चारा वीज पडून जळून खाक झाला.
उमराणे येथील अभय प्रवीण देवरे यांच्या घरावरील पत्रे उडून झोळीत झोपलेला तीन वर्षाचा मुलगा अभय पत्र्यासहित दूर फेकला गेल्याने सुदैवाने किरकोळ जखमी होऊन वाचला, त्यास मालेगावी खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. नथु श्रावण देवरे यांच्या शेतातील ट्रॅक्टर वर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. यासह अन्यही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
