नाशिक शहर
देवळालीतील या कार्यक्रमासाठी हजारो भाविकांची उपस्थिती
कलापूर्णम तीर्थधाममधील ४७ दिवसीय उपधान पर्वाचा समारोप
Wegwan nashik/वेगवान नाशिक.
८ जून, देवळाली कॅम्प :-
मनात उत्पन्न होणाऱ्या शुद्ध विचारांना चालना देण्यासाठी तपस्येचा मार्ग जैन धर्मामध्ये सांगितला आहे. गेले ४८ दिवस केलेल्या उपधान तपाचारणामुळे आज या बालकांसह सहभागी तपस्वींवर जैन धर्माच्या संस्काराची पेरणी झाली आहे.यापुढे त्यांच्यात धर्माविषयी प्रेम जागृत होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन श्रीमद आचार्यदेव हंसरत्न सुरीश्वरजी महाराज यांनी केले.
देवळालीत जैन बांधवांच्या कलापूर्णमं तीर्थधाम येथे आयोजित ४७ दिवसाच्या उपधान पर्व महोत्सवाच्या पारणा महोत्सव सोहळ्यात मालारोपण विधीप्रसंगी ते साधकांसह उपस्थित भाविकांना उद्देशून बोलत होते.
येथील बालगृह रोडवरील मुंबईस्थित गुणोपासक परिवार ट्रस्ट व कलापुर्णम तीर्थधाममध्ये जैन अध्यात्मयोगी संत आचार्य कलापुर्णमसुरीश्वरजी यांच्या आशीर्वादाने येथे भव्य ‘कलापुर्णम तीर्थधाम ‘नामक २४ तीर्थंकरांचे जैन देरासार साकार करण्यात आले आहे. या देरासरच्या प्रांगणात असलेल्या भवनात आचार्यदेव श्री तत्वदर्शनसुरीश्वरजी महाराज व आचार्यदेव श्री हंसरत्न सुरीश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळी सुट्यांचे औचित्य साधत गेल्या १७ एप्रिलपासून ८ जून पर्यंत असे ४७ दिवस भव्य उपधान पर्व सुरु होते.
या उपधान पर्वामध्ये सध्याच्या टीव्ही मोबाईलच्या जमान्यात मुलांची मानसिक व शारीरिक तयारी तसेच त्यांच्यावर जैन धर्माच्या संस्काराची पेरणी करण्यासाठी सुरु असलेल्या या उपधान पर्वात सुमारे ४५७ जैन बालकांसह बंधू भगिनी साधक म्हणून प्रवेश केला होता. त्याची सांगता समारोहप्रसंगी मालारोपण विधी पार पडला.
यावेळी व्यासपीठावर प.पु.श्री आचार्यदेव तत्वदर्शन सुरीश्वरजी महाराज, महोदयसागर सुरीश्वरजी महाराज, मुनीराज धर्मध्यान महाराज ,रत्नकलशविजयजी महाराज,पद्मकलश विजयजी आदी साधू महंत उपस्थित होते. यावेळी धर्मासाठी दान करणाऱ्या विविध मान्यवरांचा उपस्थित जैन मुनींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सांगता समारोपात हजारो भाविकांना अन्नदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लालजी करिया, चापसी चरला, प्रेमजी छेडा, दामजी फरिया, चापसी चरला,नरेश दोशी आदींसह कलापूर्णम तीर्थधामचे विश्वस्थ व त्यांचे सहकारी प्रयत्नशील होते.
या उपधान पर्व काळात सकाळी ५ वा. पासून सांयकाळी ५ वाजेपर्यंत प्रार्थना, भक्ती,योग, नवकार मंत्र उच्चारण, दंडवत प्रवचन, धार्मिक खेळ, व्हिडीओद्वारे धर्माची माहिती असा दिनक्रम असतो.
ट्रस्टच्या वतीने दरमहिन्याला १२५ कुटुंबांना किराणा वाटप,वर्षातून एकदा वह्या वाटप, दररोज ताक वितरण करण्यात येते. याशिवाय मागील वर्षांपासून नॅचरोपथी सेंटर उघडण्यात आले असून आजतागायत २० हजारापेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतलं आहे. भविष्यात डोळ्यांचे उपचार व वृद्धाश्रम सुरु करण्याचा मानस असल्याचे जैन मुनी धर्मध्यान महाराज यांनी माहिती देताना सांगितले.