नाशिक क्राईम
त्या तरुणाचा मृतदेह सापडला !

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : गिरणा नदीपात्रात नदीच्या खोल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या त्या २० वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान सापडला.
मेंढ्याना पाणी पाजण्यासाठी गेलेला रवी सीताराम खाताळ ( अंदाजे वय २० वर्ष ) रा. वाघापूर, ता. साक्री, जि. धुळे हा तरुण काल दि.१ रोजी नदीच्या पाण्याच्या खोल प्रवाहात बुडाला होता. त्याचा काल सायंकाळ पर्यंत शोध घेण्यात आला होता. मात्र अंधार पडल्याने काल ही शोध मोहीम थांबविण्यात आली होती.
आज पुन्हा सकाळ पासून खामखेडा गावाचे सरपंच वैभव पवार यांनी वसाका येथील पट्टीचे पोहणारे दिलीप आहेर तसेच खामखेडा येथील भारत वाघ व गावातील पोहणारे तरुण यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. याच दरम्यान पाण्यात होणाऱ्या हालचालीमुळे ८:३० वा. तरुणाचे प्रेत अचानक नदीत तरंगून बचावासाठी टाकलेल्या दोरला अडकल्याचे दिसले. पोहणाऱ्या तरुणांनी लागलीच त्या तरुणाला बाहेर काढले. प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून, तरुणाच्या मूळ गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रशासनच्या वतीने धोक्याचा फलक लावावा…..खामखेडा – भऊर पुलाजवळ नदीत २० ते २५ फूट खोल मोठ मोठे खड्डे असून नवीन या खोलीचा अंदाज येत नसल्याने येथे याआधी देखील पाण्यात बुडून जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील आठवड्यात देखील एक आजोबा व त्याचे दोन नातवंडे स्थानिकांच्या सतर्कतेमुळे बचावले होते. त्यामुळे “येथे खोल खड्डे असून कुणीही पाण्यात उतरू नये” असा फलक लावण्यात यावा अशी मागणी भऊर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप आनंदराव पवार यांनी केली आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.