नाशिक ग्रामीण

राज्यातील या नामवंत कीर्तनकार,गायक व वादकांना मिळाला हा सन्मान

हभप आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर ट्रस्टचे वारकरी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर


हभप आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर ट्रस्टचे वारकरी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

राज्यातील नामवंत कीर्तनकार,गायक व वादकांचा समावेश- पंढरपूर येथे होणार वितरण

नाशिक  :- गेल्या २६ वर्षांपासून नाशिकच्या श्री क्षेत्र लहवित येथील हभप श्री आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर ट्रस्टच्या विद्यमाने व देहूकर फडाच्या सहमतीने वारकरी पंथाच्या महाराष्ट्रातील अतिशय सेवाभावी व गौरवशाली व्यक्तींस दिला जाणाऱ्या ‘सदगुरु वै. हभप सोपानकाका देहूकर वारकरी पुरस्कार ‘ घोषित करण्यात आले आहे. यावर्षीचा संत प्रभूती पुरस्कार देहू येथील गाथा मंदिराचे अध्यक्ष ह भ प गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले (२०२४) यांना जाहीर झाला आहे. ५१ हजार रु. रोख,पोशाख स्मृतिचिन्ह, मानपत्र व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. या पुरस्कारांचे वितरण आषाढ शु. द्वादशी, शुक्रवार दि.१८ जुलै २०२४ रोजी दुपारी २ वा. पंढरपूर येथील कुंभार घाट परिसरातील श्री देहूकर वाडा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्याप्रसंगी वितरित केले जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हभप गंगाधर जाधव यांनी दिली आहे.

   यावर्षीचा ‘सांप्रदायिक मृदूंग वादक सेवा पुरस्कार’ बीड येथील आदिनाथ महाराज फपाळ, ‘सांप्रदायिक वारकरी भजन सेवा पुरस्कार ‘ आळंदी येथील संगीत अलंकार पंडित विष्णूजी महाराज सोळुंके ‘देहूकर महाराज फड सेवा’ पुरस्कार गुरुभक्त हभप संजय महाराज सोळुंके (कराडकर)

या तीन मान्यवरांस प्रत्येकी २५ हजार रु.रोख पोशाख, सन्मानचिन्ह व महावस्त्र पंढरपूर येथील हभप श्रीगुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते प्रदान केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संतवीर हभप संतवीर बंडा तात्या कराडकर तर प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठल रुख्मिणी मंदिर समिती सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, देहूकर फडाचे हभप बापूसाहेब महाराज देहूकर, हभप द्वाराचार्य डॉ.रामकृष्णदासजी महाराज लहवितकर, पंढरपूर येथील हभप चैतन्य महाराज देगूलकर, त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ ट्रस्टच्या अध्यक्षा हभप.कांचनताई जगताप, देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे आदींसह फडप्रमुख, दिंडीप्रमुख, वारकरी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!