सरकारी माहिती
लालपरिच्या सेवेने केली इतकी वर्ष पूर्ण
एसटीची वाटचाल अत्याधुनिकतेकडे- आगामी काळात अधिक सुविधा देणार भर- एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांची ग्वाही
लालपरिच्या सेवेने केली इतकी वर्ष पूर्ण
एसटीची वाटचाल अत्याधुनिकतेकडे- आगामी काळात अधिक सुविधा देणार भर- एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांची ग्वाही
वेगवान नाशिक/Wegwan Nashik. १ जून :-
सध्या राज्यभरात प्रवास करण्यासाठी विविध वाहने व खाजगी बसेसच्या सुविधा उपलब्ध असल्या तरी गेल्या ७६ वर्षांपासून ‘ गाव तेथे एसटी’ या ब्रीदवाक्यानुसार आजही महाराष्ट्रासह शेजारील गुजरात,आंध्र प्रदेश, तेलंगणा,कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये विस्तारलेल्या एसटी सेवा ७६ वर्ष पूर्ण करून ७७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. दरवर्षी १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. उद्या १ जून रोजी एसटीच्या सर्व बसस्थानकांवर प्रवासी व सर्व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात येत आहे. वर्धापन दिनानिमित्त सर्व बसस्थानके रांगोळी काढून, फुलापानांचे तोरणे बांधून सजविण्यात आली आहे.
स्वातंत्र्यापूर्वी १९३२ साली खाजगी व्यावसायिकस्तरावर सुरू झालेली ही सुविधा पुढे वर्षात सोळा वर्षानंतर बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करत असताना याच नावाने कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहिल्यानगर (अहमदनगर) या मार्गावर धावली. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर बीएसआरटीसी मध्ये अन्य भागातील प्रवासी सेवा देत असलेल्या संस्थांचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ( एम एस आर टी सी) च्या माध्यमातून कारभार सुरू झाला. आज राज्यभरात अनेक दुर्गम भागात एसटी आपली सुविधा देत आहे. काळानुरूप स्वतःलाही बदलत एसटीने निमआराम वातानुकूलित, अश्वमेध, शिवनेरी,शितल, शिवशाही अशा वातानुकूलित सुविधाही उपलब्ध करून देताना यामध्ये वायफाय सारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर आता डिझेल वाचावे म्हणून इलेक्ट्रिक बस असलेली शिवाईची सेवा देखील राज्यभरात सुरू करण्यात आली आहे. इंटरनेटच्या जमान्यात प्रवाशांच्या हाती मोबाईल आला असताना संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा उपलब्ध आहे तर मोबाईल ॲप उपलब्ध करून देत सेवेचे आणखीन एक पाऊल पुढे टाकले. राज्यभरात अनेक ठिकाणी खेड्यातील नागरिकांना शहरात व शहरातील नागरिकांना ग्रामीण भागात सेवा देताना शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हक्काची लाल परी ही बनली. आज एमएसआरटीसीकडे १५ हजाराहून हजारो बसेस उपलब्ध आहे. गेली ७६ वर्ष राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व किफायतशीर प्रवाशी दळणवळण सेवा देण्याचे प्रयत्न एसटी प्रामाणिकपणे करत आली आहे. आता देखील ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक अडी-अडचणी, अडथळे, आर्थिक संकटावर मात करत राज्याच्या डोंगरदऱ्यातील वाडया वस्त्यांपासून आदिवासी पाडया पर्यत एसटी आपली प्रवासी दळणवळण सेवा देत आहे. त्यासाठी ८७ हजार कर्मचारी व अधिकारी वृंद रात्रंदिवस राबत आहेत. केवळ ३६ बेडफोर्ड बसेवर सुरू झालेला हा प्रवास ७६ वर्षात १५ हजार बसेस पर्यंत पोहोचला आहे. या बसेस च्या माध्यमातून ५६० पेक्षा जास्त बस स्थानकावरून दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी- विद्यार्थीनी, पत्रकार अशा ३० पेक्षा जास्त समाज घटकांना एसटीच्या प्रवाशी सेवेमध्ये ३३ टक्कयावरून १०० टक्कयांपर्यंत शासनाद्वारे सवलत दिली जाते. याबरोबरच गणेश उत्सव, दिवाळी, आषाढी, कार्तिर्की यात्रा अशा अनेक सण आणि उत्सवाच्या निमित्ताने नियमित फेऱ्यांबरोबरच विशेष् फेऱ्या सोडून एसटी सर्व सामान्य प्रवाशांबरोबरच भाविक प्रवाशांची सोय करते. तसेच शालेय सहली, लग्न समारंभ, विविध शासकीय महोत्सव, मेळावे यासाठी देखील एसटी आपली सेवा पुरवीत आहे.
कोट- १ :- गेली ७६ वर्ष प्रवाशांचे प्रेम आणि विश्वासार्हता या शिदोरीवर एसटी “महाराष्ट्राची लोकवाहिनी” बनली आहे. भविष्यात देखील प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने एसटी कटिबध्द राहील! अशी ग्वाही देत, लाखो प्रवाशांना हार्दिक शुभेच्छा :-डॉ.माधव कुसेकर. मा.उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
कोट २:- ७६ वर्षांमध्ये सर्वसामान्यांची सेवा करताना महाराष्ट्राची लोकवाहिनी हे विशेषण एसटीला मिळाले आहे व हे विशेषण सार्थ ठरविण्यासाठी आगामी काळात सेवेमध्ये अमुलाग्र बदल करत दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध राहणार आहे. :- अभिजीत भोसले जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ.मुंबई.