नाशिकचे राजकारण
नाशिक शिक्षक मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून अॅड.संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर
शिवसेनेच्या उबाठा गटात प्रवेश करत मिळवली उमेदवारी
नाशिक शिक्षक मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून अॅड.संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर
Wegwan nashik/ वेगवान नाशिक.
१ जून
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी विद्यमान आमदार किशोर दराडे यांचे तिकीट कापत महाविकास आघाडीने कॉंग्रेसचे नेते आणि जिल्ह्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक अॅड. संदीप गुळवे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली सुभाष देसाई विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला व लागलीच त्यांची आगामी शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
नाशिक येथील जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली असून अॅड. गुळवे यांनी मुंबई येथे जाऊन शिवसेना कार्यालयात पदाधिकार्यांशी चर्चा केली असता नाशिकच्या शिक्षक मतदार संघासाठी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून संदीप गुळवे हे शिक्षक मतदार संघात संपर्क ठेवून होते. यापूर्वी त्यांनी ‘ परिवर्तनाचा निर्धार संदीपभाऊ आमदार ‘ ची हाक देत विविध शैक्षणिक संस्थामध्ये जात मतदारांच्या गाठीभेटी घेत आपण निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. निवडणूक आयोगाने गेल्याच आठवड्यात विधान परिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर मतदार संघ तर नाशिक व मुंबई शिक्षक मतदार संघ याकरता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बुधवार दिनांक २६ जून रोजी निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यासह जळगाव धुळे नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक मतदार या निवडणुकीत मतदान करतील. या निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असताना पहिल्याच दिवशी ३९ इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी केले होते. त्यात नाशिक साठी १८ उमेदवार इच्छुक असून नगर मधील १४ तर जळगाव मधील ५ इच्छुकांचा समावेश आहे.