नाशिक शहर
पिण्याचे पाणी मिळत नसल्याने येथील रहिवाश्यांनी केला प्रशासनाचा निषेध
देवळाली कॅम्पच्या बालगृहरोड भागातील नागरिकांचा कॅन्टोन्मेंट प्रशासनावर रोष

पिण्याचे पाणी मिळत नसल्याने येथील रहिवाश्यांनी केला प्रशासनाचा निषेध
देवळालीच्या बालगृहरोड भागातील नागरिकांचा कॅन्टोन्मेंट प्रशासनावर रोष
वेगवान नाशिक/wegavan nashik ३१ मे. –
देवळाली कॅम्प :– मागील तीन महिन्यापेक्षा अधिक दिवसांपासून देवळालीच्या बालगृहरोड भागात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने येथील नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय गाठत ‘ पाणी द्या…पाणी द्या…! सीईओ साहेब दालनाबाहेर या… पाकीट घेणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे…अशी घोषणाबाजी करत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गजभिये यांना निवेदन देत आपल्या मागण्या मांडल्या आहे.
उन्हाळा सुरु झाल्यापासून बालगृह रोड ,लामरोड व दस्तगीर बाबा रोड परिसरात पाण्याचा पुरवठा हा कमी दाबाने होत आहे. बालगृहरोडच्या विठ्ठलवाडी भागात गेल्या काही वर्षात सोसायटयांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्या तुलनेने पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्या या अपुऱ्या पडत असल्याचे निष्पन्न होत आहे. संबंधित वॉल्वमन योग्य पद्धतीने वॉल खोलून देत असला तरी या भागात असलेल्या सोसायट्या व काही नागरिक पिण्याचे पाणी भरण्यासाठी मोटरींचा वापर करत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या भागात गरजेपुरते देखील पाणी उपलब्ध होत नसल्याचे सांगत येथील रहिवासी निवृत्ती गीते, वैभव पाळदे, रतन जाधव, राजू खैरनार, जगदीश कुटे,रवी वाजे, विजय निकम, योगेश सातपुते, रवी देवकर, संदीप मोगल, सागर देवकर आदींसह महिला व ज्येष्ठ नागरिकांनी डोक्यावर हंडा घेत प्रशासनाच्या या ढिल्या कारभाराचा निषेध व्यक्त करत यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदनमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राहुल गजभिये यांची भेट घेत सादर केले.
