वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : देवळा शहरात पतसंस्थांच्या माध्यमातून ३१ मार्च २४ अखेर १०९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले असून १७७ कोटींच्या ठेवी जमा झाल्या असून १४७०० सभासद आहेत. त्यामुळे शहरातील उद्योगाला सहकाराच्या माध्यमातून चालना मिळत असल्याचे प्रतिपादन नाफेडचे राज्य संचालक केदा आहेर यांनी येथील नव्याने स्थापन होत असलेल्या बालाजी व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
अध्यक्षीय भाषणात बोलतांना ते पुढे म्हणाले की, सहकार टिकला तर उद्योग टिकेल सहकाराच्या माध्यमातून तरूणाईला कर्ज वितरण होते. व छोट्या मोठ्या उद्योगाने व्यवसाय वाढीस लागतात. यासाठी व्यवसायकांनी देखील परत फेडीचे दायित्व दाखवले तर सहकाराला बळकटी मिळेल. यामुळेच बँका, पतसंस्था सुस्थितीत राहून आर्थिक सक्षम होत असतात. ठेवीदारांच्या ठेवींची सुरक्षितता व ठेवीदारांचा विश्वासार्हता वाढण्यास मदत होते.
देवळा शहरात सर्वच संस्था सुस्थितीत असून त्या वाढीस नेण्याची जबाबदारी जशी संचालक मंडळाची आहे. तितकिच कर्जदारांची पण असते व संचालक मंडळाने सर्व निकषांचे पालन करून कर्ज वितरण केले तर संस्थेला कुठेही बाधा पोहचत नाही. तरुण मंडळीने एकत्र येऊन शहरातील १५ वी बालाजी व्यापारी पतसंस्थेची स्थापना केली असून पहिल्याच दिवशी ठेवींचा उच्चाक गाठला, ही बाब अभिमानास्पद असल्याचेही आहेर म्हणाले.
यावेळी स्वामी दिनेशगिरी महाराज, आमदार डॉ. राहुल आहेर, डाॅ. विश्राम निकम यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. व्यासपीठावर जि.प. चे माजी आरोग्य सभापती अरुण आहेर, योगेश आहेर, कोमल कोठावदे, जितेंद्र आहेर, सुनील आहेर, अंबादास आहिरराव, हितेंद्र आहेर, वसंतराव आहेर, सतीश राणे, जसराज सुराणा, अशोक सुराणा, अतूल पवार, निंबा धामणे, आदी प्रमुख पाहूणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार पतसंसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पवन आहिरराव यांनी मानले. सुत्रसंचालन भगवान आहेर यांनी केले.
यावेळी देवळा शहरातील काही महीलांनी स्बळावर आपला उदरनिर्वाह प्रपंच सांभाळून व्यवसाय करून मुला मुलींचे शिक्षण करून लग्न लावून दिले. व आजही त्या छोटेमोठे व्यवसाय करून आपला प्रपंच चालवित आहेत. अशा निवडक पाच महिलांचा पतसंस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व भेट वस्तू देवून सन्मान करण्यात आला. जेणेकरून इतर महिलांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. ह्या हेतूने पतसंस्थेने वेगळा उपक्रम राबविला.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांची कधीही एकमेकांशी जमवून न घेणारे नेते मंडळी बालाजी पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर दिसल्याने चर्चेचा विषय ठरला.