माजी नगरसेविकेच्या पतीसह चौघांवर हत्याराने वार… नाशिक मध्ये या ठिकाणी घडली ही घटना…!
माजी नगरसेविकेच्या पतीसह चौघांवर हत्याराने वार... नाशिक मध्ये या ठिकाणी घडली ही घटना...!

वेगवान नाशिक / नितिन चव्हाण :, ता,२८ मे २०२४
चेहडी पपिंगजवळील खर्जुल मळा, मोरया पार्क येथे लहान मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आवाज व गोंधळ कमी करा असे सांगितल्याचा राग आल्याने
तीन चार जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल व इतर तिघांवर तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी करण्यात आल्याची घटना (दि.२७) मध्यरात्री घडली.
खर्जुल मळा येथील मोरया पार्क येथील संदीप गाढवे यांच्या मुलाचा सोमवारी वाढदिवस असल्याने रात्री घरासमोर छोट्याशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वाढदिवसाचा केक कापल्यानंतर सुरू असलेला आवाज कमी करा, गर्दी-गोंधळ करू नका असे किरण खर्जुल यांनी सांगितले.
वाढदिवस साजरा केल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी शांततेत निघून गेले.
रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास किरण दिनकर खर्जुल हे घराजवळ चक्कर मारत होते.
यावेळी दुचाकीवर आलेल्या तीन- चार जणांनी काही एक विचार न करता किरण यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढविला.
यामुळे जोरदार आवाज झाल्याने घरात असलेले शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल, किरणचा भाऊ दीपक हे घराबाहेर येऊन त्यांनी मारामारी सोडवण्याचा प्रयत्न केला.
मात्र यामध्ये नितीन यांच्या देखील पोटाच्या दोन्ही बाजूला वार झाले. तसेच मदतीसाठी आलेल्या दीपक व योगेश खर्जुल यांच्यावर देखील वार झाले.
या हल्ल्यात किरण हा गंभीर जखमी झाला आहे. चौघा जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. चौघा जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक
रामदास शेळके यांनी घटनास्थळी
धाव घेतली होती.
