नाशिक ग्रामीण

माथाडी कामगार टाकणार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार?


वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : आपल्या हक्काचे काम काढून घेतल्यामुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीतील संतप्त हमाल व मापारी कामगारांनी दि. २० मे रोजी होणाऱ्या  लोकसभा निवडणुकीतील मतदानावर आपल्या कुटुंबियांसह बहिष्कार टाकण्याचा इशारा देत आपला निषेध व्यक्त केला आहे. तशा आशयाचे निवेदन  तहसिलदार, सहाय्यक निबंधक व पोलिस निरीक्षक देवळा यांना देण्यात आले आहे.

निवेदनाचा आशय असा कि हमाल व मापारी कामगारांचे बाजार समिती मधील गेल्या ४५ दिवसापासून विनाकारण  हक्काचे कामकाज काढून घेण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी,  जिल्हा उपनिबंधक, पणन संचालक  व  कामगार आयुक्त यांनी सदर व्यापारी असोसियशन यांना हमाल व मापारी कामगार यांचे प्रचलित पद्धतीने कामकाज सुरु ठेवण्याबाबत सुचना दऊनही, त्याकडे दुर्लक्ष करत व्यापारी अमोसिएशनने मनमानी पद्धतीने कांदा लिलाव सुरु करून हमाल व मापारी कामगार यांना प्रचलित पद्धतीने काम करण्यात सहभागी करून घेण्यात आले नाही. सद्या हे सर्व माथाडी कामगार बाजार समिती कार्यालयासमोर दिवसभर बसून असतात. शुक्रवार दि. १७ मे पर्यंत माथाडी कामगारांना प्रचलित पद्धतीने काम करू दिले नाही तर लोकसभा निवडणुकीतील मतदानावरील बहिष्कार कायम ठेवण्यात येईल असा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला आहे.

निवेदनावर कामगार संचालक भाऊराव बाबुराव नवले, दादाजी अमृता देवरे, राजेंद्र शंकर बच्छाव संदीप श्रावण देवरे,  वैभव जिभाऊ भामरे, दिनेश सुभाष आहेर आदींसह ८o ते ९०  माथाडी कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतमालाची हमाली, तोलाई व अनुषंगिक माथाडी स्वरूपाची कामे परवानेधारक हमाल व मापारी कामगारांकडून प्रचलित पद्धतीने करून घेतली जात, पूर्वी हि सर्व कामे मोठया कष्टाची व मेहनतीची होती.  परंतु काळानुरूप त्यात अनेक सुधारणा झाल्या. यामुळे माथाडी कामगारांचे कष्ट कमी झाले,  परंतु बाजार समितीत होणारी शेतकऱ्यांची फसवणुक टाळण्यासाठी व शिस्त पालनासाठी माथाडी कामगार हा घटक अत्यावश्यक असल्याचे बहुतांश शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर त्यांना आता फारसे काम नसल्यामुळे त्यांची गरज नाही असे काही शेतकऱ्यांचे तसेच शेतकरी संघटनांचे मत आहे.

बहुतांश माथाडी कामगार हे पन्नाशी पार केलेले असून त्यांच्यावर मुलामुलींचे शिक्षण, लग्न आदी कौटुंबिक जबाबदाऱ्या असतांना त्यांच्यावर हि बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. देवळा बाजार समितीत ६९ हमाल व २७ मापारी कामगार आहेत. माथाडी कामगार सनदशीर मार्गाने लढा देत असतांना शासनाने आचारसंहीता असल्याचे कारण देत ह्या प्रश्नाबाबत चालढकल केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


बाबा पवार

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!