लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार यांना झाला जाहीर
Wegwan news/ वेगवान न्युज – दि.१७ मे
लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार कवी ललित अधाने यांना जाहीर
देवळाली कॅम्प:- महाराष्ट्रातील नामवंत कवी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप तसेच इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रसिद्ध व्याख्याते प्रा. जावेद शेख यांच्या वतीने दरवर्षी लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार त्या वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट काव्यसंग्रहाला दिला जातो. 2023 या वर्षातील लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार कवी ललित अधाने यांच्या माही गोधडी छप्पन भोकी या काव्यसंग्रहाला निवड समितीचे अध्यक्ष कवी लक्ष्मण महाडिक यांनी जाहीर केला. निवड समितीत जयश्री वाघ, ज्ञानेश उगले, सागर जाधव या मान्यवर साहित्यिकांनी सदस्य म्हणून काम बघितले.
शेतकरी ,कष्टकरी, गावखेडे याचे समकालीन वास्तव मांडताना केवळ रडण्याची कविता न लिहिता लढण्याची कविता ललित अधाने यांच्या माही गोधडी छप्पन भोकी या कवितासंग्रहात दिसते. भूमी आणि भूमिका घेऊन ललित अधाने हा कवी कविता लिहितो. दलित साहित्याप्रमाणे टोकाचा विद्रोह ग्रामीण कवितेत अभावाने दिसतो. तो ललितच्या कवितेत सापडला आहे. ही कविता जळजळीत वास्तव मांडते. या व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालते म्हणून ही कविता वेगळी ठरते. यामुळे आम्ही यावर्षी या संग्रहाची निवड सर्वानुमते पुरस्कारासाठी केली आहे. असे प्रतिपादन निवड समितीचे अध्यक्ष कवी लक्ष्मण महाडिक यांनी पुरस्कार जाहीर करताना केले.
अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे स्वरूप असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण 26 मे रोजी निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील मॅग्नस द्राक्ष एक्सपोर्ट कंपनीच्या आवारात सायंकाळी चार वाजता मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती या पुरस्काराचे संयोजक संदीप जगताप व जावेद शेख यांनी दिली.
महाराष्ट्रात अतिशय सन्मानाचा समजला जाणारा लोककवी विठ्ठल वाघ साहित्य पुरस्कार ललित अधाने या कवीला मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.