सामाजिक तेढ निर्माण करणारे मेसेज व्हायरल कराल तर खबरदार…!
वेगवान नाशिक
सिन्नर, ता. 15 – में 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष मतदान आणि प्रचारादरम्यान निवडणूक लढवणाऱ्या कोणत्याही उमेदवाराशी संबंधीत त्यांचे वैयक्तीक, कौटुंबिक अगर सामाजिक स्तरावर अवहेलना होईल असे आक्षेपार्ह टिकाटीप्पणी, मजकुर, फोटो, व्हिडीओ (एडिट/मॉर्फिग) सोशल मीडियावर प्रसारीत करणे अथवा आलेल्या संदेशावर आपले आक्षेपार्ह मत प्रकट करणे व पुढे पाठविणे हा प्रकार करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास नेटकऱ्यांना
कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांनी दिला आहे.
पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील विविध व्हाट्सअप ग्रुप तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोलिसांकडून कलम 149 अन्वये इशारा नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक दरम्यान निवडणूक आयोगाने निर्देशित केलेली आदर्श आचारसंहिता पालन करणे प्रत्येकाने क्रमप्राप्त आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापर करताना आचारसंहिता काळात कोणत्याही उमेदवार अथवा त्यांच्याशी संबंधित राजकीय पक्ष, कौटुंबिक अथवा सार्वजनिक बाबींसंदर्भात पोस्ट वायरल करणे गैरवर्तणूक ठरेल. असे प्रकार आढळून आल्यास अथवा या प्रकारांमुळे सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण झाल्यास संबंधित व्यक्तीस जबाबदार करण्यात येईल. त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक निरीक्षक श्री पवार यांनी नोटिशीत नमूद केले आहे. जिल्हाधिकारी नाशिक यांच्या निर्देशानुसार पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात ही नोटीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
असे प्रकार ठरतील गुन्हा…
मतदाराचे मन वळविण्यासाठी कोणत्याही धर्माच्या लोकांमध्ये धार्मीक, भाषिक तसेच जातीत व्देष पसरविणारे आक्षेपार्ह मजकुर फोटो, व्हिडीओ (एडिट/मॉर्फिग) करून प्रसारीत करणे.
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाथा निर्माण होईल अशा प्रकारचे स्वतंत्र सोशल मिडीया ग्रुप निर्माण करून त्याव्दारे आक्षेपार्ह मजकुर, फोटो, व्हिडीओ (एडिट/मॉर्फिग) करून प्रसारीत करणे अथवा त्यास प्रोत्साहन देणे.
बॉक्स..
व्हाट्सअप सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गावात वापरले जातात. ग्रुपच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक जण या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. निवडणूक काळात कळत अथवा नकळत वायरल होणारा एखादा मेसेज कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्राधान्याने कार्यक्षेत्रातील गावातील प्रत्येक व्हाट्सअप ग्रुपवर नोटीस पाठवण्यात आली आहे. एखादा अनुचित प्रकार घडल्यास कारवाईसाठी ही नोटीस पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल.
– संदेश पवार (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वावी)