वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : प्रवाशांची लूट करून पळून जाणाऱ्या आरोपींना जागरूक नागरिकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. यात रस्त्यावरच्या युवा कार्यकर्त्यांनी सक्रिय सहकार्य केल्याने चारही आरोपींना देवळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर हा गुन्हा मालेगाव हद्दीत झाल्याने सदर संशयित आरोपींना मालेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, टाकळी ता. मालेगाव येथील रामदास शेवाळे हे पत्नीसमवेत सौंदाणे ता. मालेगाव येथून नाशिकला जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी मारुती इको गाडी ( जी.जे.२६ ए.बी.४१९३) ला हात दिला असता ते या गाडीत बसले. थोडे अंतर गेल्यावर या गाडीतल्या इसमांनी त्यांच्याकडून १४ हजार रु. व इतर ऐवज काढून घेतला व त्यांना उतरून देत गाडी परत मालेगावकडे वळवली.
शेवाळे यांनी प्रसंगावधान दाखवत झालेला प्रकार मुंगसे येथील डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांना फोनवर कळवला. डॉ. सूर्यवंशी यांनी गावातील युवा कार्यकर्त्यांना सोबत घेत सदर गाडी मुंगसेजवळ अडवण्याचा प्रयत्न केला परंतु अतिवेगामुळे ते शक्य झाले नाही.
हार न मानता येतील डॉ. सूर्यवंशी, पंकज शेवाळे, सागर सयाजी, निलेश दामू, दर्शन शिवाजी, योगेश भामरे, प्रकाश सूर्यवंशी, जयेश सूर्यवंशी तसेच मेशी येथील सरपंच बापू जाधव, शरद सूर्यवंशी, मोहन बोरसे, प्रवीण शिरसाठ, भिला आहेर व इतरांनी इतर वाहनांच्या साहाय्याने पाठलाग करत पाटणे, महालपाटणे, मेशी या गावांमध्ये गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु ते वेगवेगळे मार्ग धरत असल्याने व वेग खूप असल्याने आव्हानात्मक झाले होते. पण तरीही यावर मात करत या आरोपींना देवळा मार्गावर पकडण्यात यश आले.
याबाबत या युवकांचे कौतुक करण्यात येत आहे. यात एकूण चार आरोपी असून देवळा पोलिसांनी त्यांना मालेगाव पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे.
देवळा पोलिसांची माहिती सांगण्यास उदासीनता : याबाबत संबंधित आरोपींना देवळा पोलीस ठाण्यात जवळपास तीन ते चार तास ठेवण्यात आले होते. त्यांनंतर त्यांना मालेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वृत्तपत्रांच्या प्रतिनिधिंनी देवळा पोलिसांशी संपर्क साधून घटनाक्रम, आरोपींची माहिती व नावे विचारली असता अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी एकमेकांची नावे दाखवत माहिती देण्यास टाळाटाळ केली. यामुळे देवळा पोलिसांबाबत साशंकता निर्माण झाल्याने सदर घटनाक्रम व इतर माहिती मालेगाव येथून मिळवावी लागली.
नाशिक व्हॅाटसअप ग्रुप | Join |
नाशिक व्हॅाटस्अप चॅनल | Join |
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.