नाशिकचे राजकारण

देवळ्यात भगरे की डॉ.पवार? कांदा, ड्रायपोर्ट, मोदी फॅक्टर काय ठरेल प्रभावी!


वेगवान नाशिक  / बाबा पवार

देवळा : सद्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत होते की काय असे चित्र असतांना माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जे. पी. गावित यांच्या माघारी झाल्याने आता शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी वाजविणार मनुष्य चिन्हावर भास्कर भगरे व भाजप च्या कमळ चिन्हावर विद्यमान खासदार भारतीताई पवार निवडणूक लढवत असून यांच्यात समोरासमोर लढत होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
 देवळा तालुक्याचा एकंदरीत लेखा जोखा बघितला तर एकीकडे भास्कर भगरे हा नवीन चेहरा तर दुसरीकडे देवळा तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य, विद्यमान खासदार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असा परिचित चेहरा भारतीताई पवार यांचा आहे. भगरे व पवार या दोघा उमेदवारांचा देवळा तालुक्यातील प्रचार दौरा देखील मागील काही दिवसात पूर्ण झाला आहे.
तालुक्यात प्रामुख्याने पाहिले तर शेती हा मुख्य व्यवसाय असून कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. आणि हा कांदाच आता मतदानाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मोदी सरकारच्या काळात वेळोवेळी झालेली निर्यातबंदी यामुळे कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसल्याची  नाराजी तालुक्यातील जनता बोलून दाखवत आहे. प्रचार दौऱ्यात देखील विद्यमान खासदार भारतीताई पवार यांना  तालुक्यातील उमराणे, मेशी गावात कांदा प्रश्नाला सामोरे जावे लागले.  विरोधात असलेल्या भास्कर भगरे यांनी देखील पुढील पक्षाची दुखती नस ओळखून कांदा प्रश्नावरच हल्ला चढवल्याचे दिसून आले.
मोदी सरकार हे किती शेतकरी विरोधी आहे व आम्ही सत्तेत आल्यावर शेतकरी विषयक काय योजना, कायदे आणणार आहोत यावर मुख्यतः भगरे यांचा प्रचार सुरू आहे. कांदा विषय प्रामुख्याने पुढे येत असल्याने शरद पवार यांनी वेळोवेळी कांदा उत्पादकांची बाजू मांडल्याचे भास्कर भगरे नमूद करत असून, मोदी सरकार ने कसे कांदा उत्पादकांचे नुकसान केले हे प्रभावीपणे ते मांडत आहेत.
दुसरीकडे कांदा विषयावर ७० वर्षात कुठलाच ठोस पर्याय तत्कालीन सरकार देऊ शकले नाही. आम्ही नाफेड सारखे पर्याय शोधत बाजारभाव स्थिरीकरण करण्याचा पर्याय पुढे आणला. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तेव्हा अनुदान देऊ केले. याही पुढे जाऊन निफाड येथे आता ड्रायपोर्ट तथा मल्टी मॉडेल हबसाठी १०८ एकर जमिनीची देखील खरेदी करण्यात आली आहे.
हा प्रकल्प पूर्ण होताच पुढील काळात कांदा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला यांची निर्यात करून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुद्दे घेऊन भारतीताई पवार जनतेपुढे जात आहेत. तसेच जागतिक पातळीवर तणावाची परिस्थिती असतांना विविध देशात मोदींची असलेली प्रभावी छाप, कलम ३७०, राम मंदिर, दहा वर्षात शासनाने केलेल्या विविध कामांची पावती देत भाजपच्या भारतीताई पवार यांचा प्रचार सुरू आहे.

केदा आहेरांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली तर?
देवळा तालुक्यात राजकीय प्रभाव पाहिला तर विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर व भाजपा नेते केदा आहेर यांची ताकद निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. सोबतच भाजपा मित्र पक्षाचे नेते, कार्यकर्ते हे भारतीताई पवारांच्या प्रचार दौऱ्याची धुरा सांभाळत आहेत. दुसरीकडे केदा आहेर यांना नाशिक लोकसभेचे तिकीट मिळेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा असताना पक्षाने त्यांचा विचार केला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली तर तो भारतीताई पवार यांच्यासाठी मोठा फटका असेल.

पक्ष फुटीच्या भळभळत्या जखमा
 देवळा तालुक्यात आमदार डॉ. राहुल आहेर व केदा आहेर यांची मोठी ताकद असली तरी काँग्रेस, मित्र पक्ष तसेच अगोदरच फूट पडलेले शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाचे नेते पक्ष फुटीच्या भळभळत्या जखमा घेऊन भास्कर भगरे यांच्या पाठीशी उभे राहून खिंड लढविण्याचा प्रयत्न करत आहे. ही लढाऊ वृत्ती राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना पक्षांच्या कार्यकर्त्यांत बळ देणारी देखील ठरू शकते.

यावेळी निवडणूक जनतेच्या हातात!
असे सर्व चित्र असताना देखील ही निवडणूक यावेळी जनतेने हातात घेतल्याचे देखील बोललं जातं आहे. त्यामुळे आता भारतीताई पवार यांचा कांद्यामुळे वांदा होतो की, मोदी नेतृत्व म्हणून पुन्हा संधी मिळते हे येणारा काळच सांगेल. दुसरीकडे भास्कर भगरे सारख्या नव्या चेहऱ्याला शरद पवारांचा छत्रछायेचा, कांदा विषयावर भर दिल्याचा फायदा होतो की, काँग्रेस ने  कलम ३७० ला केलेला विरोध, राम मंदिराचे निमंत्रण नाकारणे हा कळीचा मुद्दा ठरेल हे चित्र आता निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.


बाबा पवार

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!