सिडकोतील प्रतिशिर्डी असलेल्या साईनाथ मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा..!
सिडकोतील प्रतिशिर्डी असलेल्या साईनाथ मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा..!
वेगवान नाशिक / सिडको प्रतिनिधी नितिन चव्हाण ता :,११ मे २०२४
जुने सिडकोतील साईनाथ मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांनी दोन दिवसीय साई महोत्सवाचे आयोजन केले आहे. अक्षय तृतीयेच्या संध्येला जुने सिडको परिसरातून साई पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. रस्त्यावर सर्वत्र सडा, रांगोळी काढून पालखीचे औक्षण करत महिलांनी या मिरवणुकीचे स्वागत केले.
या मिरवणुकीत खा. हेमंत गोडसे, शिवसेना उपनेते विजय करंजकर, प्रकाश लोंढे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, माजी नगरसेवक मुकेश शहाणे, सुदाम डेमसे, भागवत आरोटे, किरण गामने, बाळा दराडे, प्रतिभा पवार, भाजपा मंडळ अध्यक्ष रवी पाटील, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, अविनाश पाटील, प्रविण मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
फणकार बँड, सटाणा ढोल पथक, लेझर शो, पेपर ब्लास्ट, मेळगांव डफली, तुतारी, भालेदार, चोपदार, बारा फूटी साईबाबा, पांढरा फुटी कालीकृष्ण, अघोरी पथक, हनुमान बजरंगबली चलचित्र, बारा फुटी राम, लक्षुमन,सीता, कालीमाता चलचित्र, वारकरी पथक आकर्षक विद्युत रोषणाई असलेले साई छत्त्रीया पालखी मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरले.
महाबली हनुमानसोबत सेल्फी काढण्यासाठी अबाल वृद्धांनी गदर्दी केली होती. हास्य क्लबच्या महिला टाळ मृदुंगासह सहभागी झाल्या होत्या. पेपर ब्लास्ट आणि लेझर शोचा बालगोपाळ आणि युवकांनी मनमुराद आनंद लुटला. ओम साईनाथ ट्रस्टच्या महिला सदस्यांनी दक्षिण भारतीय वेशभूषा करून मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
जुने सिडकोतील शनि मंदिर चौक, महात्मा फुले चौक, हरेश्वर मंदिर चौक, महाराणा प्रताप चौक, वीर सावरकर चौक, तुळजाभवानी चौक परिसरातून ही साई पालखी मिरवणूक काढण्यात येऊन साईनाथ मंदिरात समारोप करण्यात आला.
हजारो भाविक या साई पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते. बारा फूटी साई बाबा, आकर्षक विद्युत रोषणाई असलेले साई छत्र या पालखी मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरले.