खोदलेला जेलरोड त्वरित डांबरीकरण करा अन्यथा..

वेगवान/नाशिक
नाशिक रोड, दिनांक 17 एप्रिल 2024
महिनाभरापासून खोदून ठेवलेला जेलरोड त्वरित दुरुस्त करून डांबीरकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. इंगळेनगर चौकापासून सेंट फिलोमिना शाळेपर्यंतचा रस्ता जलवाहिनीसाठी खोदून ठेवल्याने वाहतूकीचा खोळंबा होत असून धुळीमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. खोदलेला रस्ता व धुळीमुळे वाहनचालक, व्यावसायिक आणि रहिवासी भयंकर त्रस्त झाले आहेत. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जेलरोडहून उपनगर नाक्याकडे जाणारा कॅनलरोड हा जलवाहिनीसाठी खोदून अनेक महिने झाले तरी तो अजूनही डांबरीकरण केलेला नाही. रात्री जलवाहिनीला धडकून येथे दुचाकीस्वार ठार होऊनही ठेकेदारावर कारवाई झाली नाही. आता जेलरोड पाण्याची टाकी संत अण्णा चर्चपर्यंत रस्ता खोदण्यात आला आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर रस्ता माती लोटून पूर्ववत करण्यात आला. मात्र, डांबरीकरण न केल्यामुळे दिवसरात्र धुळीचे लोट उठत असतात. त्यामुळे नागरिक, वाहनचालक, व्यावसायिक यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अजूनही रस्ता खोदकाम सुरुच आहे. वाहतुक कोंडी होत आहे.
जेलरोड भागात अनेक शाळा, प्रेस, सरकारी महत्वाची कार्यालये, भाजीबाजार आहे. त्यामुळे नाशिकरोड ते जेलरोड या रस्त्याला कायम रहदारी असल्याने या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यात जलवाहिनीच्या संथ कामाने वाहतूक कोंडीच्या समस्येत आणखी भर पडली आहे. या कामामुळे वाहनधारक संताप व्यक्त करत आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची, शालेय वर्दीवाले वाहनधारक अशी सर्व गर्दी या भागात एकवटते. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. रस्ते खोदून ठेवल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे धुळीचे कण सर्वत्र पसरून स्थानिक रहिवाशी आणि व्यावसायिक पुरते त्रस्त झाले आहे.
गेल्या महिन्याभरापासून येथील रोडवर पाईपलाईनचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहनचालक आणि रहिवाशी हैराण झाले आहेत. काम त्वरित पूर्ण करून रस्ता डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा व्यावसायिक वाहनचालक व रहिवाशांनी यांनी दिला आहे.
