लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर आजपासुन कांदा लिलावास सुरूवात
वेगवान नाशिक/ समिर पठाण
लासलगाव/१२एप्रिल २०२४
शेतकरी बांधवांच्या हिशोबपावतीतुन हमाली, तोलाई व वाराईच्या रकमा कपातीबाबत नाशिक जिल्ह्यासह लासलगांव बाजार समितीचे बंद असलेले कांदा लिलाव आजपासुन पुर्ववत सुरू झाले असल्याची माहिती लासलगांव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी दिली.
नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनमार्फत दि. 01/04/2024 पासुन जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमाल विक्री केलेल्या शेतकरी बांधवांच्या हिशोब पावतीतुन हमाली, तोलाई व वाराईची रक्कम कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लासलगांवसह जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील कांदा, भुसार व तेलबिया ह्या शेतीमालाचे लिलाव गेल्या 07 ते 08 दिवसांपासुन बंद असुन लिलाव बंदच्या पार्श्वभुमीवर बाजार समिती व जिल्हा प्रशासनाने शेतकरी बांधवांच्या व्यापक हिताचे दृष्टीने बंद असलेले लिलावाचे कामकाज पुर्ववत सुरू करणेबाबत संबंधित घटकांच्या वेळोवेळी बैठका घेतलेल्या आहे. परंतु सदर बैठकीत सर्वमान्य तोडगा न निघाल्याने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये दैनंदिन कांदा, भुसार व तेलबिया शेतमाल लिलावाचे कामकाज बंद होते. त्यामुळे लासलगांव बाजार समितीने दि. 10 एप्रिल, 2024 रोजी सदस्य मंडळाची बैठक घेऊन सदर बैठकीत कांदा ह्या शेतीमालाचे लिलाव प्रचलित पध्दतीने पुर्ववत सुरू करणेसाठी जुने व्यापारी सहभागी होत नसल्याने बाजार समितीने म. जिल्हा उपनिबंधक साहेब, सहकारी संस्था, नाशिक यांचेकडील पत्राप्रमाणे लिलावाचे कामकाज सुरळीत सुरू करणेसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने नविन व्यापाऱ्यांना आवाहन करून त्यांचेकडुन अनुज्ञप्तीची पुर्तता करून घेऊन त्यांचेमार्फत आज शुक्रवार, दि. 12 एप्रिल, 2024 पासुन कांदा ह्या शेतीमालाचे लिलाव पुर्ववत सुरू केले असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी दिली.
यावेळी क्षिरसागर यांचेसह इतर मान्यवरांच्या हस्ते कांदा विक्रीसाठी आलेल्या पहिल्या वाहनाचे विधीवत पुजन करण्यात आले. मुहूर्तावर भावेश केदा आहेर (धामोरी) यांचा कांदा हा शेतीमाल शिवस्वराज्य एक्सपोर्टस् यांनी रू. 2,900/- प्रती क्विंटल या दराने खरेदी केला. सायंकाळपर्यंत 622 कांदा शेतीमाल वाहनांची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी रू. 801/- जास्तीत जास्त रू. 2,900/- सरासरी रू. 1,500/- याप्रमाणे होते.
याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती गणेश डोमाडे, सदस्य पंढरीनाथ थोरे, जयदत्त होळकर, संदीप दरेकर, डॉ. श्रीकांत आवारे, छबुराव जाधव, महेश पठाडे, राजेंद्र बोरगुडे, रमेश पालवे, सचिव नरेंद्र वाढवणे, सहसचिव प्रकाश कुमावत, सर्व लिलाव प्रमुख सुरेश विखे, काकासाहेब जगताप, हिरालाल सोनारे यांचेसह सर्व कर्मचारी, शेतकरी, अडते / व्यापारी, माथाडी / मापारी कामगार व इतर मार्केट घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.