नाशिक…भुजबळांना उमेदवारी मिळत नसेल तर आमच्याकडे एक नेता आहे
वेगवान नाशिक
नाशिक रोड, प्रतिनिधी 9 एप्रिल 2024
लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या युतीत नाशिक लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेंच सुरु आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात तांत्रिक अडचण येत असेल तर याच पक्षाचे नेते निवृत्ती अरिंगळे यांना उमेदवारी द्यावी, नाशिकरोडला नेतृत्वाची संधी मिळावी, अशी मागणी अरिंगळे समर्थकांनी पक्षाचे नेते अजित पवारांकडे केली आहे. या वेळी समर्थकांनी एकच वादा, अरिंगळे दादा, अरिंगळेदादा तुम आगे बढो….. अशा घोषणा दिल्या.
काही दिवसांपूर्वी अरिंगळे यांनी मुंबईत अजित पवारांची उमेदवारी संदर्भात भेट घेतली होती. पक्षाचे नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे यांनी देवळालीगाव येथे आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. या वेळी माजी नगरसेवक जगदीश पवार, विक्रम कोठुळे, विनोद देशमुख, प्रशांत वाघ, मंगेश लांडगे, हेमंत कांबळे, ताहीर शेख, भगवान थोरात, चैतन्य देशमुख, राकेश कांबळे, वाल्मिक बागूल, शरद जोशी आदी उपस्थित होते.
मनोहर कोरडे म्हणाले की, देवळाली मतदार संघ ४५ वर्षांपासून राखीव असल्याने अनुभवी असूनही अरिंगळे यांना संधी मिळालेली नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत आहे. येथून छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांना उमेदवारी देण्यात तांत्रिक समस्या येत असतील किंवा भुजबळ स्वतः इच्छुक नसतील तर निवृत्ती अरिंगळे यांना उमेदवारी देण्यास प्राधान्याने विचार व्हावा. अरिंगळे हे १९८० पासून राजकीय, सामाजिक चळवळीत सक्रीय आहेत. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. नाशिक साखर कारखान्याचे ते संचालकही होते. १९९० पासून नाशिकरोड व्यापारी बॅंकेचे ते संचालक आहेत. तसेच अध्यक्षही होते. या बॅंकेचे कार्यक्षेत्र नाशिक लोकसभा असून बॅँकेचे दीड लाखावर खातेदार आहेत. त्यामुळे अरिंगळे यांचा ग्रामीण व शहरी भागात चांगला जनसंपर्क आहे. त्यांना उमेदवारी द्यावी, अन्यथा महायुतीला आमचे सहकार्य राहणार नाही.