स्टेट बॅंकेत खाते उघडण्यास सांगण्यात आल्याने नाराजी
वेगवान नाशिक
नाशिक रोड, ता. 27 मार्च 2027 महापालिका प्रशासनाने मानधनावरील कर्मचा-यांना स्टेट बॅंकेतच खाते उघडण्याच्या सूचना केल्या आहेत. या सक्तीमुळे कर्मचा-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मानधनावर सेवा देणा-या आरोग्य व अन्य कर्मचा-यांचे वेतन वेळेत होत नसतानाच या महिना या कर्मचा-यांनी स्टेट बॅंकेत खाते उघडावे अशा सूचना महापालिकेच्या वित्त विभागाने जारी केल्या आहेत.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने मानधनावरील कर्म-यांना स्टेट बॅंकेत खाते उघडण्याची सक्ती करू नये. त्यांचे वेतन वेळेत करावे. त्यांना त्वरीत सेवेत कायम करावे अशी मागणी माजी नगरसेवक समाजभूषण जगदीश पवार यांनी केली आहे.
नाशिक महापालिकेत तुटपुंजे मनुष्यबळ आहे. अशा परिस्थितीत काम करणारे आरोग्य विभागातील मानधनावरील डॉक्टर आणि नर्स मनापासून रुग्ण सेवा देत आहे. गेल्या पाच वर्षापासून या कर्मचा-यांना नियमित वेतन मिळत नाही. दोन ते तीन महिन्यांनी वेतन मिळते. मुदत संपली तरी कामाची ऑर्डर लवकर मिळत नाही. त्यामुळे संसार करताना अडचणी येतात. अनेकदा निवेदन देऊनही प्रशासन कार्यवाही करत नाही. वैद्यकीय, नर्स, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे पाच वर्षापासून वेगवेगळ्या बॅंकेत खाते आहे. त्यांना स्टेट बॅंकेत खाते उघडण्यास सांगण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
बिटको रुग्णालयात सोनोग्राफी मशिन चार वर्षापासून बंद आहे. ईसीजी मशिन चालविण्यासाठी महिला व पुरुष कर्मचारी नाही. त्यामुळे कोणीही इसीजी काढते. एक्स रे मशिन ठेवलेल्या परिसरात स्वच्छता नसते. तेथे बसण्यासाठी रुग्णांना जागा नाही. बिटकोत नियमितपणे स्वच्छता होत नाही. पुरेसे पाणी नसते. रुग्णालयात सतत तोडफोडीची कामे सुरु असतात. येथे हाडांच्या डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्वचारोग तज्ञ सहा महिन्यांपासून नाही. हृदयरोग तज्ञाची सेवा पुरेशी नाही.