नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा अध्याय सतरावा

देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज जीवनचरीत्र


वेगवान नाशिक / अतुल सुर्यवंशी 

दि.3/1/2024

// श्री यशवंत लिलामृत //

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

अध्याय १७ वा

अध्यात्म कामाच्या कधी आड येत नाही /
कर्मयाेगाने कामात आडकाठी नाही /
ऊलट आध्यात्म सत्कर्मास पाेषक राही /
म्हणुन निर्दाेष असता असत्य स्विकार्य नाही //

    महाराज जवळपास सतरा ते अठरा दिवस मुंबईत शिंदे सरकारच्या राजवाड्यात थांबले हाेते. म्हणुन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह जवळपासच्या सर्वच ठिकाणाहुन अनेक लाेक त्या राजवाड्यात येऊ लागले. प्रचंड प्रमाणात हार नारळे व मिठाई च्या राशीच्या राशी महाराजांच्या चरणाशी पडु लागल्या. मुंबईच्या ईतीहासात पहील्यांदाच एक नवलाई ची गाेष्ट घडली ती म्हणजे मुंबईतील हार, नारळे व मिठाई संपुष्टात आली. माेठमाेठ्या व्यापा-यांनी ताेंटात बाेटे घालुन आश्चर्य व्यक्त केले. मग घाे-घाे बंदराला तारा करुन मुंबईत मिठाई व हार नारळे मागवण्यात आले. शिंदे सरकार व ब्रिटीश गव्हर्नरने अठरा दिवस महाराजांची माेठी बडदास्त ठेवली. मग महाराज आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले. महाराज सटाणा येथे परतत असतांना “पुणे” येथील काही भक्तांनी महाराजांना पुणे ह्या गावी एक दाेन दिवस यावे व आम्हासही आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करु लागले. मुळातच भक्ताभिमानी असलेले महाराज आपल्या भक्तांची ईच्छा माेडणार तरी कसे? महाराज कधीही कुणाचेही मन माेडीत नसत म्हणुन महाराजांनी दाेन – तीन दिवसासाठी पुणे येथे जाण्याचा निर्णय घेतला. पुणेकरांना प्रचंड आनंद झाला. सटाण्याचे देवमामलेदार आपल्या पुणे ह्या गावी दाेन दिवस थांबणार ही वार्ता सर्वत्र पसरल्या नंतर तर सर्व जाती धर्मातील लाेक महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी करु लागले. अशातच पुणे ह्या गावातील अगदी प्रतिष्ठीत व्यक्ती श्री सहस्त्रबुध्दे व पानसे जे पुण्यातील लाेकांनाही प्रीय हाेते व पुणे ह्या गावावर ज्यांचा चांगला पगडा हाेता. पण मुळात ते अतीशय विघ्नसंताेषी हाेते व भाेळसट लाेकांना ते नेहमी भाेंदुगीरी करुन फसवत असत. त्या लाेकांनी तर एक विचीत्रच याेजना आखली. त्यांना महाराजांना देव मानणे काही पटले नाही व जे पुणेकर काल पर्यंत आपलीच हाजी हाजी करत हाेते ते तर आज ह्या मामलेदारांचे गुणगाण गाऊ लागले. ही तर आपल्यासाठी धाेक्याची घंटा आहे व अशाने तर आपल्या व्यवसायावर ही परीणाम हाेईल अशी भिती त्यांना वाटु लागली. मग त्यांनी एक याेजना आखली की सटाण्याच्या त्या मामलेदारांना आपण आपल्या ह्या महालात बाेलावुन घेऊ व त्यांना ऊकळत्या पाण्याने आंघाेळ घालु. दुस-या दिवशी सकाळीच ते महाराजांकडे गेले व महाराजांना विनवु लागले की, “महाराज तुम्ही आमच्या ह्या गावी आलात. तेव्हा आमच्या महलात ही चलावे. आम्ही तुम्हाला पंचामृताने स्नान घालु ईच्छीताे.” हे ऐकुन तर पुणेकरांनाही आनंद झाला कारण आपल्या पुण्याचे सर्वेसर्वा सहस्त्रबुध्दे व पानसे हे देवमामलेदारांना पंचामृताने स्नान घालणार आहेत ही आपल्या साठी किती भाग्याची गाेष्ट आहे.असे पुणेकरांना वाटु लागले. मात्र यांच्या मनात भयंकरच काहीतरी शिजत हाेते. मग ते महाराजांना घेऊन आपल्या महलात गेले. महाराजांबराेबर अनेक भक्तगण ही महाराजांचे पंचामृताने हाेणारे स्नान आपल्या डाेळ्यांनी बघु ह्या आशेने गेले. मग सहस्त्रबुध्दे व पानसे हे महाराजांना घेऊन न्हाणीघरात गेले. तेथे एक माेठा चाैरंग ठेवला व त्या चाैरंगावर महाराजांना बसवीले. बाकीच्या भक्तांना तुम्ही बाहेरुनच बघावे असे त्या दाेघांनी सांगीतले. मग भक्तगण ही बाहेरुनच बघु लागले. त्या दाेघांनी मग पटापट ऊकळते पाणी महाराजांच्या अंगावर टाकण्यास सुरुवात केली. पण भक्तांना काहीच माहीती नव्हते. मग काही भक्तांनी महाराजांच्या आंघाेळीचे पाणी आपण तीर्थ म्हणुन घ्यावे असा विचार करुन न्हाणीघराच्या बाहेरील नळकांड्यास पाणी घेण्यासाठी हात लावला. तेव्हा त्या भक्तांना जबरदस्त चटका बसुन त्यांच्या हातावर टरारुन फाेडे आली. परीस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काही जण मग ताबडताेब न्हाणीघराकडे धावले व त्या दाेघांना धक्काबुक्की करु लागले. महाराज शांतपणाने चाैरंगावर बसलेले हाेते. त्यांच्या चित्तवृत्तीवर काही एक परीणाम झालेला नव्हता. त्यांच्या स्थितप्रध्न अवस्थेला थाेडाही धक्का लागलेला नव्हता. भक्तमंडळी संतापाच्या भरात त्या दाेघांना चाेप देण्याच्या तयारीत असतांनाच महाराजांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. मग भक्तमंडळी महाराजांना घेऊन त्या महालातुन बाहेर पडले व आपल्या पहील्या ठिकाणी आले. त्या दिवशी मग पुणेकरांनाही कळुन चुकले हाेते की ज्या सहस्त्रबुध्दे व पानसेंना आपण मानताे ते मुळात किती भाेंदु आहेत. सर्व भक्तांना महाराजांची चिंता वाटु लागली. ऊकळत्या पाण्याने महाराजांना आंघाेळ घातल्याने महाराजांचे अंग तर भाजले नसेल ना? ह्या चिंतेने जाे ताे महाराजांच्या अंगावर लेप लावु लागला. पण महाराजांच्या अंगावर कुठेही फाेड कींवा जळाल्याच्या खुणा दिसत नव्हत्या. थाेड्याच वेळात ज्या सहस्त्रबुध्दे व पानसेंनी महाराजांच्या अंगावर ऊकळते पाणी टाकले हाेते तेच दाेघ आता त्यांच्या अंगाची आग आग हाेत असल्या कारणाने महाराजांकडे पळतच आले व महाराजांना विणवु लागले, “महाराज आम्हाला माफ करा. आम्ही कुत्सीत हेतु व दुष्ट बुध्दीने तुमच्या अंगावर ऊकळते पाणी टाकले व ते पाणी तुम्ही पंचामृत म्हणुन स्विकारले. पण आता मात्र आमचेच अंग भाजु लागले आहे. अंगाची लाही लाही हाेत आहे. महाराज दया करा” असे म्हणुन महाराजांच्या चरणावर गडबडु लागले. महाराज सर्वांचेच कल्याण चिंतणारे थाेर महापुरुष हाेते म्हणुन अशा विघ्नसंताेषी लाेकांनाही महाराज माफ करुन टाकत. महाराजांनी लगेच विठ्ठलाच्या मुर्तीचा अभिषेक केला व स्वामी समर्थांचे नामस्मरण करीत ते तिर्थ त्या दाेघांच्या अंगाला लावु लागले व काही तिर्थ त्या दाेघांना पिण्यासही दिले. काही वेळातच त्या दाेघांना आराम वाटु लागला. अंगाचा दाह शांत झाला. ज्या सहस्त्रबुध्दे व पानसे यांनी ऊकळते पाणी महाराजांच्या अंगावर टाकले हाेते त्यांच्याच अंगाचा दाह महाराजांनी तिर्थाने शांत केला हाेता. ते दाेघ मग महाराजांचे चरणस्पर्श करुन रडु लागले हाेते. अशातच मग दाेन दिवस निघुन गेले व महाराज आपल्या सहका-यां बराेबर पुण्याहुन सटाण्यास परतले. ब-याच दिवसांपासुन सटाण्यातुन बाहेर गेलेले महाराज आज सटाण्यात परतल्याने सर्व सटाणेकरांना खुप आनंद झाला. सर्वजण मग महाराजांच्या प्रवासाच्या तसेच मुंबई व पुणे येथे घडलेल्या घटनांचा वृत्तांत ऐकु लागले व ताे संपुर्ण दिवस सटाणेकरांनी महाराजांसमवेतच अतीशय आनंदाने घालवीला. जवळपास पंचवीस ते सत्तावीस दिवस सटाण्यापासुन लांब राहीलेल्या महाराजांनी लगेच आपली मामलेदार पदाची धुरा सांभाळली व मागील दिवसांच्या रजेचा आपल्या कामकाजावर परीणाम हाेणार नाही याची दखल घेऊन लगेच कामकाजास सुरुवात केली. ईतक्या दिवसांचा प्रवास करुन घरी थकुन आल्यावर देखील महाराजांनी दुस-याच दिवशी आपली ड्युटी जॉईन करुन कर्तव्यात कुठलीच कसुर करु नये हा संदेशच जणु आपल्या वागण्यातुन दिला हाेता. महाराजांनी नेहमी प्रमाणेच आपले दैनंदीन कामकाज चालु केले हाेते.

अशा प्रकारे महाराजांच्या मुंबई व पुणे येथील प्रवासात ह्या सर्व घटना घडतात व महाराज आपल्या सटाणा ह्या गावी परत येतात व येथे सतरावा अध्याय संपताे.

क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे, (उज्जैन) ईंदाैर.

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो. ९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button