नाशिक ग्रामीण

यशवंतगाथा अध्याय नव्वा

बागलाणचे आराध्य दैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजाचे जीवनचरित्र


वेगवान नाशिक/अतुल सुर्यवंशी 

दि.२६/१२/२०२३

  1. // श्री यशवंत लिलामृत //

अध्याय ९ वा

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

ईतका प्रकार झाला/ सत्रा दु:खाने कातावला / धनासाठी धनी गमावला/
मी घाेर अद्न्यानी// भक्तांचा शब्द राखण्या/ देव करी लिला नाना/
यशवंत देवांना / विठ्ठल पाठीराखा झाले //

    दिवसामागुन दिवस जात हाेते. महाराजांच्या जिवनात चमत्काराचे अनेक प्रसंग घडतच हाेते. पण महाराज त्या चमत्कारांचे स्वत: कधीच श्रेय घेत नव्हते. ही सारी प्रभुची लिला आहे असे भक्तांना सांगत. मामलेदार पद व संतत्व असा अजाेड समन्वय त्यांनी आपल्या जिवनात साधला हाेता. अन्नदान व प्रेमाची फार माेठी शिकवण ते आपल्या कृतीतुन जनतेला शिकवत असत. एकदा असेच महाराज घरात बसलेले असतांना त्यांना रस्त्यावरुन जाेराचा आवाज ऐकु आला. ते बाहेर आले व बघीतले तर एक बैलगाडीवाला आपल्या बैलांना चाबकाने जाेरजाेरात मारीत हाेता. महाराज त्याला सांगु लागले, “नका हाे मारु त्यांना.” त्यावर ताे गाडीवान म्हणाला, “देवा मी जर त्यांना मारले नाही तर ते पळणार नाहीत मग मी धान्य वेळेवर कसा पाेहचवीणार?” यावर महाराज शांतपणे म्हणाले, “ह्या मुक्या जिवांना न मारता देखील तुला तुझे काम वेळेवर करता येईल.” महाराजांनी लगेच त्या गाडीवानाच्या हातातील चाबुक घेतला व ताे चाबुक बैलांवर ऊगारुन म्हणाले, “ए पळा रे” बैल ही लगेच पळु लागले. “काठी, चाबुक हे फक्त त्या मुक्या जिवांना धाक दाखवीण्यासाठी वापरायचे, मारण्यासाठी नाही. आपल्या पुर्वजितानुसारच त्या मुक्या जिवांना ही याेनी प्राप्त झाली आहे त्यामुळे ते ओझी वाहन्याचे काम करतात. त्यामुळे नियतीचे काम हे नियतीलाच करु द्यावे. आपण जर ते केले तर आपणही पुढे भाेग निर्माण करताेय असे समजावे.” अशा प्रकारे महाराजांची युक्ती व प्रेमाच्या संदेशाचे प्रत्यय अनेकांना वेळाेवेळी येत हाेते. एकदा असेच महाराज कचेरीत गेले असता तीन चार कैदी जिल्हा कचेरीला नेण्यासाठी आणलेले हाेते. त्या कैद्यांचे ऊदास चेहरे पाहुन महाराजांना ही अतीशय दु:ख झाले. कारण अनेक दिवसांपासुन ते कैदी ऊपाशीच हाेते. महाराजांनी लगेच शिपायामार्फत घरी रुक्मिणीमातेकडे निराेप पाठवीला की तीन चार जणांसाठी त्वरीत सुग्रास जेवणाचा डबा पाठवावा. रुक्मिणीमातेनीही मग ताबडताेब पंचपक्वान तयार करुन ताे डबा शिपायामार्फत लगेच कचेरीत पाठवीला. यशवंतराव महाराजांनी सर्व कैद्यांना त्या सुग्रास भाेजनाने तृप्त केले व मनाशीच म्हणाले, “जसा माझा धर्म आहे तसाच ताे त्या कैद्यांचाही आहे. अन्नदानाचा हा धर्म सर्वांसाठीच ठेवावा.” महाराजांचा हा ऊदारपणा बघुन मग त्या कैद्यांनाही अश्रु अनावर झाले व ते लगेच महाराजांच्या चरणावर लाेळुन महाराजांना सांगु लागले, “महाराज आम्ही आमचे सर्व आयुष्य हे चाेरी, दराेडा अशा गैरवर्तनातच घालवीले. लाेकांना त्रासच दिला. त्यामुळे आम्हाला आपली संस्कृती, धर्म याबद्दल कधी कळलेच नाही व आम्ही जाणुनही घेतले नाही. देव म्हणजे काय हे माहीतही नाही त्यामुळे काशी पंढरी ही पाहीली नाही. मात्र आता कसलीच खंत नाही. आता आयुष्यात कुठे जाण्याचीही गरज नाही. आज येथेच बघीतला विठाेबा. तुच आमचा राम आणि तुच आमचा शाम. आज खराेखरच आमचे भाग्य ऊजळले व
तुमच्या चरणांचे दर्शन झाले. रुक्मिणीआईच्या हातचे अन्न आम्ही खाल्ले. रुक्मिणीमाता म्हणजे आमची अन्नपुर्णा आई.” असे म्हणुन त्या कैद्यांनी महाराजांचा आशिर्वाद घेतला व भावी आयुष्य हे सन्मार्गाने जगण्याचे वचन दिले व महाराजांचा जयजयकार करीत ते कैदी जिल्हा कचेरीस जाण्यासाठी निघाले. अशा प्रकारे कुठलीही खटपट न करता किंवा भाषण न देता केवळ आपल्या कृतीतुन व चांगल्या वर्तनातुन महाराजांनी कैद्यांच्या बुध्दीचा कायापालट केला व त्यांना सन्मार्गाला लावले. महाराजांना दानधर्मासाठी नेहमी पैशांची गरज पडत. आपला संपुर्ण पगार दानधर्मातच खर्च हाेऊन जात. त्यामुळे काही वेळेस महाराजांना सावकारांकडुन कर्ज ही घ्यावे लागत असत पण कधीही महाराजांनी आपल्या जिवनात दानधर्म व अन्नदानात कमतरता केली नाही त्यामुळे सावकारही महाराजांना अगदी मनमाेकळे पणे पैसे ऊसनवार देत असत. असाच एकदा घडलेला हा प्रसंग- महाराजांकडे गाेरगरीब जनता तसेच गरजु लाेकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच हाेती. एकदा महाराजांना जनतेच्या गरजा पुर्ण करण्यासाठी माेठ्या रकमेची गरज पडली त्यामुळे महाराजांनी सिंदखेडयापासुन जवळच असलेल्या “पाटण” ह्या गावच्या सर्वात श्रीमंत सावकार ‘श्री सत्रा पाटील’ यांच्याकडुन पाचशे रुपये कर्ज घ्यायचे ठरवीले. महाराज पाटण ह्या गावी सत्रा पाटील कडे पाचशे रुपये ऊसने घ्यायला गेले. खानदेशचे चालते बाेलते दैवत श्री यशवंतराव महाराज स्वत: आपल्याकडे अचानक आल्याने सत्रा पाटील ची चांगलीच तारांबळ ऊडाली. त्यांना माेठा अचंबा वाटला. सत्रा पाटीलने यथायाेग्य पध्दतीने महाराजांचे स्वागत केले. महाराज पाटलांना म्हणाले, “पाटीलबुवा दानधर्मासाठी आम्हाला माेठ्या रकमेची गरज असल्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलाे आहाेत आमची गरज पुर्ण करावी ही विनंती.” यावर सत्रा पाटील म्हणतात, “महाराज तुमच्या कामासाठी स्वर्गातील देव सुध्दा नाही म्हणणार नाही.विनंती कसली तुम्ही आदेश करावा. सांगा महाराज किती पैसे पाहीजे?” यावर महाराज म्हणतात, “पाटीलबुवा आम्हाला पाचशे रुपये हवे आहेत. पण आठ किंवा पंधरा दिवसानंतर आम्ही ते पैसे फेडु.” असे सांगीतल्यावर सत्रा पाटील लगेच ऊठले व आतल्या खाेलीत जाऊन थैलीत पाचशे रुपयाची रक्कम घेउन आले व ती रक्कम महाराजांच्या हातात देत म्हणाले, “महाराज तुमचे हे काम मी करताे आहे पण माझी ही काही अडचण आहे. ५०० रुपये एवढी माेठी रक्कम जर तुम्ही ऊशीरा पाठवली तर माझे माेठे नुकसान
हाेईल. त्यामुळे आठ दिवसात रक्कम परत करा. मी एक छाेटा सावकार म्हणुन राेख बाेलणार. माझे बाेलणे कदाचीत तुम्हाला टाेचणार. पण काय करु? ईलाज नाही. मी सावकार आहे म्हणुन बाेलायला ही राेखठाेक आहे. ह्या व्यवहारात तसेच रहावे लागते.” असे म्हणुन त्याने पाचशे रुपयांची थैली महाराजांकडे दिली. महाराजांनी लगेच ती थैली कपाळाला लावली व सत्रा पाटीलला म्हणु लागले, “पाटीलबुवा माेठे ऊपकार झाले तुमचे.पण थाेडा अवधी दिला असता तर बरे झाले असते. पण जाऊद्या मी आठ दिवसातच तुमचे पैसे परत करताे.” असे म्हणुन महाराज ते पैसे घेऊन सिंदखेड्याला निघुन गेले. ईकडे आता आठ दिवसाच्यावर दिवस हाेऊन गेले. पण महाराज ते पाचशे रुपये दिलेल्या वेळेत परत करु शकले नाहीत. म्हणुन सत्रा पाटील महाराजांबद्दल रागारागात अद्वातद्वा बाेलु लागला. आठ दिवसापेक्षा जास्त दिवस लाेटले गेले तरी महाराजांनी माझे पैसे परत केले नाही असे गावभर सांगु लागला व काही काही बाेलुन महाराजांचा अपमान करु लागला. काही वेळातच सत्रा पाटीलच्या दरवाजावर जाेरदार थाप पडली. कुणीतरी एक व्यक्ती आवाज देऊन जाेरजाेरात सत्रा पाटीलचा दरवाजा वाजवत हाेता. “सत्रा पटेल दरवाजा खाेलाे, जल्दी कराे.” असे म्हणत हाेता. सत्रा पाटलानी दरवाजा ऊघडला व समाेर बघीतले तर एक सावळ्या रंगाचा, मध्यम ऊंचीचा, काळेभाेर डाेळे व मध्यमबांधा असलेला माणुस दिसला. सत्रा पाटीलने त्याची चाैकशी केली असता ताे लगेच सांगु लागला, “मै अनंतसींग परदेशी हु. मामलेदार यसवंत साहब का सिपाही हु. यसवंत साहब ने मुझे यहा भेजा है. ये लाे आपके पाचसेाै रुपये और जल्दी से रसीद लिखदाे. और हा ठिक तरह से पैसे गिनलाे पुरे पाचसौ है. देखाे मै राेखठाेक बाेलनेवाला आदमी हु. पर क्या करे पैसाे के मामले मे एैसा ही रहना पडता है. आप जल्दीसे पैसे मिलने की रसीद लिख दाे तब तक मै गाव मे से भगवान चाैधरी से मिलकर आता हु.” असे बाेलुन ताे मनुष्य निघुन गेला. सत्रा पाटीलला माेठे आश्चर्यच वाटले व संभ्रमावस्थेत ताे पडला कारण महाराजांना पैसे ऊसने देतांना सत्रा पाटील सुध्दा महाराजांशी ह्याच परखड भाषेत बाेलला हाेता व आज अगदी तेच शब्द त्याला त्या अनंतसींग नावाच्या शिपायाने एैकवले हाेते. सत्रा पाटीलने लगेच पैसे मिळाल्याची पावती तयार केली व अनंतसींग परदेशी नावाच्या त्या शिपायाची वाट पाहु लागला. एक तास झाला, दाेन तास झाले पण अनंतसींग ती पावती घेण्यास परत आलाच नाही. मग सत्रा पाटीलने गावात भगवान चाैधरीकडे जाऊन चाैकशी केली तर तेथेही अनंतसींग परदेशी नावाचा काेणी व्यक्ती आलाच नाही असे सांगीतले. तसेच गावात ठिकठिकाणी चाैकशी केली असता अनंतसींगला काेणीही बघीतले नाही असेच जाे ताे सांगु लागला. आता मात्र सत्रा पाटील पुरता बैचेन झाला. अशातच पाेस्टमन एक चिठ्ठी सत्रा पाटील कडे देऊन गेला. सत्रा पाटील ती चिठ्ठी ऊघडुन बघतात तर काय ती चिठ्ठी यशवंतराव महाराजांची हाेती. व त्यात महाराजांनी लिहीले हाेते की पाटीलबुवा काही अडचणी आल्यामुळे मी तुमचे पैसे वेळेवर पैसे पाठवु शकत नाही व अजुन काही दिवस मुदत द्यावी अशी विनंती केलेली हाेती. आता मात्र सत्रा पाटील रडुच लागला. ताे जाे शिपायाच्या वेशात अनंतसींग परदेशी आला हाेता ताे नक्की काेण हाेता? ताे मला असा राेखठाेकपणे का बाेलला? का ताे अनंतसींग म्हणजेच स्वर्गातील देव हाेता व मीच त्याला ओळखु शकलाे नाही. माझ्या कडुन यशवंत मामलेदारांचा अपमान झाला म्हणुन तर नाही देवच त्यांची बाजु सांभाळायास आले पण मी त्यांना ओळखु शकलाे नाही? असे अनेक प्रश्नांचे काहुर सत्रा पाटलाच्या मनात माजु लागले. सत्रा पाटील दु:खाने हळहळु लागला. घरी आलेल्या देवाला मी ओळखु शकलाे नाही असे म्हणुन स्वत:लाच दाेष देऊ लागला. आता मात्र क्षणाचाही विलंब न करता सत्रा
पाटील त्या पैशांच्या थैलीसह व राेख रकमेच्या पावतीसह सिंदखेड्याला यशवंतराव महाराजांना भेटण्यास निघाले.

अशा प्रकारे भक्ताची बाजु राखणारा देव पंढरपुरचा विठ्ठल स्वत: यशवंतराव महाराजांचा शिपाई हाेऊन सत्रा पाटीलचे पैसे फेडण्यास जाताे व सत्रा पाटील त्याला ओळखु ही शकत नाही. याचेच दु:ख वाटुन हा सर्व प्रकार नेमका काय हाेता हे जाणुन घेण्यासाठी सत्रा पाटील सिंदखेड्याला यशवंतराव महाराजांकडे जाण्यास निघताे व येथे नववा आध्याय संपताे.

क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे, (उज्जैन) ईंदाैर.

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो. ९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button