नाशिक ग्रामीण

यशवंत गाथा अध्याय आठवा

बागलाणचे आराध्य दैवत देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचे जीवनचरित्र


वेगवान नाशिक/अतुल सुर्यवंशी

दि.२५/१२/२०२३

// श्री यशवंत लिलामृत //

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

अध्याय ८ वा

प्रेमात एैसी शक्ती / प्रेमानेच हाेते भक्ती /
संसारी प्रेम युक्ती / माेठ्या कामाची //
नुसते भाषण न देत / सदा करुन दाखवीत/
एैसे पुण्यवंत / देव यशवंत //

     कावडीबाबाच्या दृष्टांतानंतर ख-या अर्थाने यशवंतराव महाराजांच्या अंगी असलेल्या दैवीशक्तीचा असंख्य लाेकांना अनुभव आला हाेता. कावडीबाबा गेल्यानंतर सर्व भक्तमंडळी मग महाराजांना विचारु लागले की, “महाराज तुम्ही चमत्कार कसे करतात?” महाराज हसुन म्हणाले, “मी तर तुमच्यासारखाच एक सामान्य माणुस आहे. मी काय चमत्कार करणार? करता करवीता ताे एक परमेश्वर आहे.” असे म्हणुन महाराज ती एक प्रभुची लिला आहे असे सांगुन ते त्यांच्या जिवनात घडणा-या चमत्कारांचे स्वत: कधीच श्रेय घेत नसत. त्यांचा हा माेठेपणा पाहुन मग भक्त ही त्यांच्या चरणी लीन हाेत असत. महाराजांचे हे बाेल ऐकुन मग भक्तांमधीलच एक भक्त ऊपस्थितांना सांगु लागला की, “संत कधीच चमत्कार करीत नाहीत तर भाेंदु लाेक मात्र मुद्दाम चमत्कार घडवुन आणतात. संत तर त्यांच्या विराेधात असतात. संतांच्या जिवनात जे चमत्कार घडतात ते त्यांच्या पुण्यमार्गाने गेल्यामुळे ईश्वराच्या ईच्छेनेच घडत असतात. स्वर्गातील देवतांना सुध्दा संतांचा सहवास हवाहवासा वाटताे म्हणुनच तर संतांच्या सभाेवताली अनेक देव अदृश्य रुपात प्रकटलेले असतात व ज्यावेळी भक्तांसाठी संतांच्या मुखातुन जाे आशिर्वाद निघताे, ताे आशिर्वाद हे देवताच पुर्ण करतात यालाच तर आपण चमत्कार म्हणताे.” यावर महाराज म्हणतात, “भावांनाे तुम्ही काेणत्याही परीस्थितीत रहा पण विनम्रता व स्थितप्रध्नता हा गुण असायलाच हवा. कु-हा डीने घाव घालणा-याला ही वृक्ष शेवटी आपली शितल छायाच देत असताे. हे जाणुन आपली बुध्दी, शक्ती व युक्ती सत्कारणी लावावी. समाेरील व्यक्ती कुणीही असाे, कसाही असाे तुम्ही त्याच्याशी विनम्रतेनेच वागा. आपण पुजापाठ का करताे? तर पुजा म्हणजे आत्मसमर्पण. आत्मदेवाचे वंदन. पुजा म्हणजे आत्मा व चित्तशुध्दीचा ऊपाय. हरी ईच्छेने जगावे तरच आपले संपुर्ण आयुष्य सत्कारणी लागेल. ईश्वराच्या ईच्छेने वागा. कुठल्याही प्रसंगी आनंदी रहा. आनंदी वर्तन म्हणजेच आवर्तन. आणि आवर्तन म्हणजेच जगणे हाेय.” अशा साेप्या शब्दात महाराजांनी जिवनाचे तत्वद्नान लाेकांसमाेर मांडले. अशातच दिवसामागुन दिवस निघुन गेले व सन १८६७ साली यशवंतराव महाराजांची बदली “सिंदखेडा” ह्या गावी झाली. शहादेकर मंडळी दु:खाने अतिशय हळहळले. व महाराजांना म्हणु लागले. “महाराज सर्वांची बाजु राखणारे, सर्वांची अब्रु सांभाळणारे, हृदयी कवटाळणारे तुम्हीच तर आमचे देव आहेत. त्यामुळे आम्ही कधीही देव पुजीयले नाहीत की जप, तप, ऊपवास ही केले नाहीत. तिर्थयात्रा ती ही नाही. ही शहादा नगरीच आमची पुण्यनगरी. शहादा म्हणजे शरीर व यशवंत देव म्हणजे आत्मा. आता हा आत्माच जर ह्या शरीरातुन निघुन चालला तर आम्ही तरी येथे राहुन काय ऊपयाेग? राेज तुमचे व रुक्मिणीमातेचे दर्शन हाेत हाेते. तुमच्यासारख्या आई वडीलांचे छत्र हाेते. म्हणुन तर आम्ही अगदी निर्धास्त हाेताे. देवा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करीत हाेता आता त्या मार्गदर्शनालाही आम्ही मुकणार.” लाेक आक्राेश करु लागले. पण महाराज अगदी शांतपणे सांगु लागले की, “भावांनाे आम्ही केवळ नाेकरीच्या निमीत्ताने चाललाे. आपण एकमेकांना साेडण्याचा विचार तरी शक्य आहे का? पुढेही आपण भेटतच राहु. सर्वांशी प्रेमाने वागा. सर्वांना आदराने वागवा यातच सर्वांचे सुख आहे. आम्ही काय आज येथे तर ऊद्या दुसरीकडे. नाेकरीनिमीत्ताने बदली हाेणे अटळ आहे. आम्ही चाललाे म्हणजे आपल्यातील प्रेम कमी हाेणार आहे का? आणि एक नेहमी लक्षात ठेवा कुणी कसेही असाे कुणाचाही द्वेष, मत्सर करु नका. कारण मत्सराने एखाद्या व्यक्तीवर विजय मिळवुन क्षणिक आसुरी आनंद मिळवीण्यापेक्षा सात्विक प्रेमाने संपुर्ण जग जिंकुन अक्षय्य दिव्य आनंद मिळवावा. यातच सर्वांचे हीत आहे.” असे सांगुन यशवंतराव महाराजांनी शहादेकरांचा निराेप घेतला व सिंदखेडा येथे रुजु झाले. यशवंतराव महाराज हे सिंदखेड्याला रुजुझाल्यापासुन अल्पावधीत सिंदखेडा हे गाव गर्दीमुळे गजबजु लागले. महाराजांच्या भक्तांमधे दिवसेंदिवस वाढच हाेत हाेती. सिंदखेड्याची परीस्थितीही काही वेगळी नव्हती. अशातच काही अनपेक्षीत घटनांमुळे सन १८६७ पासुन तर इंग्रजांनी भारतीयांवर अगदीच जास्त प्रमाणात आत्याचार करण्यास सुरुवात केली. संपुर्ण देश ह्या इंग्रजांच्या आत्याचाराने हाेरपळुन निघाला. त्यातल्या त्यात भारतीय शासकीय नाेकर देखील इंग्रजांनाच मिळुन जाण्यात धन्यता मानु लागले. गरीब जनतेकडुन जास्त प्रमाणात महसुल वसुल करायचा व इंग्रज सरकारला खुश ठेवुन आपले ही हीत साधायचे हा धडाकाच काही देशी अधिका-यांनी सुरु केला. त्यामुळे गरीबांचे हाल हाल हाेऊ लागले. महाराजांना मात्र ह्या गाेष्टीची खुप चिड येऊ लागली हाेती. त्यामुळे महाराज इंग्रज सरकारला काही वेळेस विराेध करु लागले हाेते. आजच्या तुलनेत त्या वेळेसच्या तहसीलदारांना जास्त प्रमाणात अधिकार हाेते व त्यांचे कार्यक्षेत्रही माेठे हाेते. आज एका तालुक्याला जास्तीत जास्त दाेनशे ते अडीचशे गावे जाेडलेली आहेत. त्याकाळात मात्र एका तालुक्यात हजार तेे बाराशे गावांचा समावेश असायचा. त्यामुळे तहसीलदारांनाही जास्तीचे अधिकार दिलेले हाेते. इंग्रजांच्या राजवटीत मामलेदार ( तहसीलदार ) पद हे फार माेठ्या कर्तव्याचे व प्रतिष्ठेचे पद मानले जायचे. मामलेदार म्हणजे तालुक्याचा राजा. मामलेदार म्हणजे आम जनता व सरकार यांमधील महत्वाचा दुवा. त्याकाळात कलेक्टर, कमीश्नर हे शब्द जनतेने फक्त ऐकलेले असत. जनतेचा त्यांच्याशी फारसा संबंध येत नसे कारण त्या पदांवर ब्रिटीशांचेच अधिकारी असत. तर मामलेदार ह्या पदावर देशी अधिकारी असत. त्यामुळे जनता मामलेदाराकडेच न्याय मागणार. वेळप्रसंगी त्याच्याच ताेंडा कडे बघणार. तालुक्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर मामलेदारासच जबाबदार धरले जात. त्यामुळे इंग्रजांचा आपल्यावर राेष नकाे व नाेकरीत काही अडचणी निर्माण हाेऊ नये म्हणुन अनेक मामलेदार इंग्रजांनाच मिळुन जाण्यात धन्यता मानत असत. पण यशवंतराव महाराज मात्र तसे नव्हते. त्यांनी आपल्या हाती असलेला प्रत्येक अधिकार हा जनतेच्या कल्याणासाठीच वापरला. त्यामुळे अनेकदा त्यांना इंग्रजांचा राेष ही पत्करावा लागत हाेता पण महाराज अगदी शांतपणाने युक्तीने आपले कर्तव्य पार पाडत असत. सिंदखेड्याच्या वास्तव्यात महाराजांच्या आयुष्यात असे अनेक कटु प्रसंग आले मात्र त्यांनी जनतेच्या कल्याणासाठीच आपले सर्व अधिकार वापरले. काही वेळेस तर महाराज आपल्या स्वत:च्या वस्तु देखील गरजु लाेकांना देवुन टाकत. असाच हा एक प्रसंग- एकदा महाराजांचा टांगा नादुरुस्त असल्याने महाराज पायी पायीच कचेरीत निघाले हाेते. तेव्हा सिंदखेड्याला रस्त्यावरच एक मुस्लीम समाजाचा फकीर भर ऊन्हामधे महाराजांना अनवाणीच पायी चालत जातांना दिसला.रस्ता तापलेला असल्याने त्याच्या पायाला माेठमाेठे फाेड आलेले हाेते. महाराजांना अगदी हळहळ वाटली महाराजांनी लगेच आपल्या पायातील बुट काढुन त्या फकीरास देऊन टाकले.व स्वत: अनवाणीच कचेरीला जाऊ लागले. त्यांचे ते औदार्य पाहुन ताे मुस्लीम फकीर रडुच लागला व वरती आकाशाकडे बघुन म्हणु लागला की, “ये अल्लाह, या परवर दिगार, तेरी ईस मिट्टी की दुनीया मे साेने के भी पुतले है. जिसके जरीये हम गरीबाे पर तेरी मेहरबानी हाेती है.” त्या फकीराने लगेच आपल्या ईस्लामी भाषेत महाराजांवर गीत तयार करुन ते गीत म्हणत ताे गावात फिरु लागला. माणसांप्रमाणेच प्राणीमात्रांवर देखील महाराजांचे खुप प्रेम हाेते. एकदा असेच कचेरीतुन घरी येत असतांना महाराजांना रस्त्यात एक गाढव तडफडत असल्याचे दिसले. महाराजांनी लगेच आपला टांगा थांबवुन गाडीवानाच्या मदतीने त्या गाढवास टांग्यात बसवीले व आपल्या घरी घेउन आले. दाेन तीन दिवस महाराजांनी त्या गाढवाची खुप सेवा केली व ऊपचार ही केले मात्र गाढव ऊपचारांना प्रतीसाद देत नव्हते. महाराजांना कळुन चुकले हाेते की हे गाढव आता काही दिवसांनी मृत्युला कवटाळेल. पण तरीही महाराज त्या गाढवाची सेवा राेज न चुकता करीतच हाेते. अशातच एके दिवशी भल्या पहाटेच त्या गाढवाचा जाेरजाेरात किंचाळण्याचा आवाज महाराजांना येऊ लागला महाराजांनी लगेच स्नान आटाेपुन ताबडताेब देवपुजा केली व काही दिवसांपुर्वीच कावडीबाबाने काशी वरुन जे पवीत्र गंगाजल आणलेले हाेते. त्यातील काही जल त्या गाढवाला पाजले. गाढवाने लगेच महाराजांच्या मांडीवर आपला प्राण साेडला. महाराजांनी अगदी शास्त्राेक्त पध्दतीने त्या गाढवाचा अंतीम संस्कार केला. धन्य ते यशवंतराव महाराज.

      अशा प्रकारे संत यशवंतराव महाराजांच्या जिवनात असे अनेक प्रसंग घडतात व येथे आठवा आध्याय संपताे.

क्रमश:

ग्रंथलेखन – संत दादामहाराज रत्नपारखे, उज्जैन ( ईंदाैर.)

शब्दांकन – श्री यशवंत निंबा साेनवणे, सटाणा.
मो.९९७५२७७९४३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button