वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,
मनमाड,नांदगाव-
दिनांक 9 मार्च 2023 रोजी नाशिक जिल्ह्यातील सर्व पंथीय ख्रिस्ती समाजातील नागरिकांनी एकत्रितरित्या त्यांच्यावर होत असलेल्या विविध आरोपांच्या विरोधात शांततेच्या मार्गाने महा मूक मोर्चा काढत ख्रिस्ती समाजाविरुद्धच्या अपप्रवृत्तींचा निषेध व्यक्त केला. प्रतिनिधींनी मा.जिल्हाधिकारी,नाशिक जिल्हा यांना निवेदन देऊन ख्रिस्ती समाजावर होणारे अन्याय,अत्याचार तसेच विविध अपप्रवृत्तीच्या व्यक्तींपासून,संस्थेपासून होणाऱ्या त्रासाच्या विरोधात शासनाकडे दाद मागितली. सर्व पंथीय ख्रिस्ती समाजाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
देशभरातील ख्रिस्ती समाजावर काही असामाजिक तत्वे हल्ले करीत आहेत.चर्च,ख्रिस्ती प्रार्थनास्थळ,प्रार्थना सभांमध्ये जबरदस्तीने,बेकायदेशीरपणे घुसून मोडतोड करणे,दमदाटी करणे,जबरदस्तीने धर्मांतर केल्याचे खोटे आरोप लावणे,ख्रिस्ती धार्मिक विधींमध्ये अडथळे आणणे, ख्रिस्ती धर्मगुरू,धर्मभगिनी ह्यांना मारहाण करणे असे निंदनीय प्रकार दिवसेंदिवस होत आहेत.पोलीस प्रशासन व राज्य शासन ह्यांच्याकडूनही ख्रिस्ती समाजावर अन्याय केला जात आहे.अशा प्रकारे विविध मार्गांनी ख्रिस्ती समाजास त्रास होत आहे.
तरी अशी बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई व्हायला हवी व ख्रिस्ती अल्पसंख्यांक समाजाला त्रास होऊ नये याबद्दल शासनाने ख्रिस्ती समाजाकडे लक्ष द्यावे ही विनंती.
ख्रिस्ती समाज हा शांततेच्या मार्गाने राहणारा व सर्व स्तरांतील जनतेच्या सेवेकरिता सतत कार्यरत असलेला समाज आहे.परंतु कांही असामाजिक तत्वांना,प्रवृत्तींना, |समाजकंटकांना देशातील व राज्यातील,शांतता-सुव्यवस्था नको आहे.तरी वरील सर्व बेकायदेशीर कृत्ये थांबायला हवीत,कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी व अल्पसंख्यांक समाजाला संरक्षण देण्यात यावे.
देशात सर्व जाती-धर्मात शांतता व सौहार्दाचे वातावरण असायला हवे ह्यासाठी आम्ही आमच्या भावना नाशिक जिल्हा ख्रिस्ती समाजाच्या मुकमोर्चाद्वारे शासनाकडे मांडित आहोत.त्यानुसार आमच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.कृपया ख्रिस्ती समाजाच्या खालील मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करून ख्रिस्ती समाजास न्याय देऊन सुरक्षा प्रदान करावी ही विनंती.
मागण्या खालीलप्रमाणे :
1. ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरू,धर्मभगीनी,प्रचारक, प्रार्थनास्थळे,प्रार्थना सभा,ख्रिस्ती संस्था ह्यांना लक्ष करून जे लोक मारहाण,मोडतोड,दहशत पसरविणे,धमकावणे, प्रार्थना सभांमध्ये,चर्चमध्ये धुसून उपद्रव करणे अशा प्रकारे कायदा हातात घेत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी.
2. ख्रिस्ती समाजाची लोक संख्या शासकीय जणगणनेत प्रत्येक दहा वर्षांत कमी होतांना दिसत आहे तर जबरदस्तीने धर्मांतर कोठे आहे ? आजवर न्यायालयात किती जबरदस्तीची धर्मांतरे सिध्द झाली आहेत ? ह्याबाबत शासनाने विचार करून ख्रिस्ती समाजाविरूध्द जबरदस्तीने धर्मांतराचा आरोप लावण्याचे षडयंत्र कोणी करीत असेल किंवा तसा प्रचार करीत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी.
3. देशभरात व महाराष्ट्र राज्यातही ख्रिस्ती समाजाबद्दल द्वेषपूर्ण व संशयपूर्ण वातावरण तयार केले जात आहे, त्यामुळे ख्रिस्ती समाजास नाईलाजास्तव रस्त्यावर उतरावे लागत आहे.ह्याची शासनाने दखल घ्यावी.
4. जेथे कोठेही कोणी चर्चमध्ये,ख्रिस्ती प्रार्थनास्थळात किंवा ख्रिस्ती प्रार्थना सुरू असेल अशा ठिकाणी जबरदस्तीने घुसेल तेथील पावित्र्य व गांभीर्य विस्कळीत करण्याचा प्रयत्न करील तर प्रथम त्याच्यावरच कारवाई व्हावी.विनाकारण तेथील धर्मगुरूस व भाविकांस पोलीस स्टेशनला बोलावून त्रास दिला जाऊ नये.
5. ख्रिस्ती युवकांना रोजगार मिळतांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी प्रयत्न व्हावेत.
6. व्यवसाय सुरू करण्यासाठी व शैक्षणिक कर्जासाठी अल्पसंख्यांक महामंडळाकडून ख्रिस्ती समाजासाठी विशिष्ठ तरतूद करावी व अर्थसहाय्य मिळण्याची प्रक्रिया सरळ व सोपी करावी.
7. राज्याच्या प्रत्येक ग्रामपंचायत,नगरपरिषद, महानगरपालिका हद्दीत ख्रिस्ती अल्पसंख्यांक समाजास कब्रस्थान मिळण्यासाठी राखीव जागा असावी
8. महाराष्ट्र विधानपरिषदेत ख्रिस्ती अल्पसंख्यांक समाजास प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी प्रत्येक पक्षातून किमान एक आमदार असावा अशी आमची मागणी आहे.
9. ख्रिस्ती समाज हा सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे.तरी त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक जीवनात व गांव-खेड्यांत द्वेषपूर्ण व भेदभावपूर्ण वागणूक मिळू नये.ह्यासाठी शासनाने कार्यवाही करून संबंधित विभागांना तशा सुचना कराव्यात.
ख्रिस्ती समाजास अनेक प्रकारे त्रास दिला जात आहे व संविधानाने दिलेले धर्मस्वातंत्र्याचा अधिकार नाकारला जात आहे आणि धर्मांतर,धर्मांतर म्हणून ख्रिस्ती समाजास बदनाम केले जात आहे.
तरी शासनाने आमच्या वरील सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा व ख्रिस्ती समाजास न्याय द्यावा ही आमची विनंती आहे.
या महा मूक मोर्चासाठी जिल्ह्यातून सुमारे 7 ते 8 हजार ख्रिस्ती धर्मीय बांधव मोठ्या संख्येने व स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली होती.
निवेदनावर रेव्ह.प्रविण घुले,रेव्ह.डि.रुपेश निकाळजे,रेव्ह. गिरीश भालतिडक,नोव्हेल मथायस,अमेय म्हस्के,वॉल्टर कांबळे यांच्या सह्या आहेत.