वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,
अविनाश पारखे,मनमाड,नांदगाव –
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सन 2016 पासून बँकेचे सभासद,वैयक्तिक ठेवीदार,नागरी पतसंस्था,पगारदार पतसंस्था,बिगरशेती पतसंस्था, सहकारी बँका अशा बहुसंख्य ठेवीदारांच्या ठेवी जमा आहेत.मात्र कर्तव्य असतानाही जिल्हा बँक ठेवीदाराला त्यांच्या गरजेनुसार पैसे परत देत नसल्याने भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासतर्फे बुधवारपासून विभागीय सहनिबंधक कार्यालय,नाशिक येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे.
ठेवीदारांना जमा रक्कम परत मिळावी याकरिता न्यासाच्या वतीने मनमाड येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन केले होते.
जिल्हा बँकेच्या नांदगाव विभागीय अधिकाऱ्यांनी प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास व मनमाड शाखेशी संलग्न ठेवीदारांना लेखी आश्वासन देऊन 1 नोव्हेंबर 2022 ते 31 मार्च 2023 हा बँकेचा वसुली हंगाम असून थकीत कर्जाची वसुली करून ठेवीदारांना ठेवीवरील व्याजाची रक्कम व मुद्दल रकमेच्या 40 टक्के जमा रक्कम ठेवीदारांना परत देण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
मात्र कोणतीही रक्कम ठेवीदार,खातेदार यांना परत मिळू शकली नाही.परिणामी वस्त्र त्याग आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले.दि.8 मार्च पासून सुरू होणार असलेले हे आंदोलन स्थगित करावे अशी विनंती देखील विभागाने केली होती.
मात्र इकडे बँकेचे अधिकारी खोटी कारणे सांगत असल्याचा आरोप करत तालुकाध्यक्ष भीमराज लोखंडे, सचिव भास्कर झाल्टे यांच्या नेतृत्वाखाली रामदास दुभासे,विष्णू चव्हाण,सुनील म्हस्के,अरविंद शिंदे यांनी हे आंदोलन सुरू केले.आज आंदोलनाचा 3 रा दिवस असून मोठ्या प्रमाणात ठेवीदार,खातेदार यांचे आंदोलनाला पाठींबा वाढताना दिसत आहे.