नविन इमारतीसाठी 10 कोटी मंजूर,आमदार कांदे यांचा पुढाकार


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,

मनमाड,नांदगाव-

राज्य शासनातर्फे नगर परिषदांना वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत मनमाड नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंजूर केला आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मनमाड नगर परिषदेची इमारत जीर्ण झाली आहे.अनेक ठिकाणी पडझड झाल्याने नवीन इमारत बांधण्यासाठी 10 कोटी रुपयांची मागणी आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती.ती मुख्यमंत्र्यांनी मान्य करीत गुरुवारी विधानसभेत आपल्या भाषणात मनमाड नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी 10 कोटींचे अनुदान मंजूर करत असल्याची घोषणा केली आहे.

नवीन नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या प्रकल्प खर्चाच्या 90 टक्के हिस्सा हा राज्य शासनाचा व 10 टक्के हिस्सा मनमाड नगर परिषदेचा राहणार आहे. कार्यान्वयन यंत्रणाही मनमाड नगर परिषद राहणार आहे. त्यानुसार लवकरच या कामाची ई-निविदा निघणार आहे. सदर काम पूर्ण करण्याची मुदत 31 मार्च 2024 आहे.

या कामासाठी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेली 9 कोटी रुपयांची अनुदानाची रक्कम तात्काळ मनमाड नगर परिषदेला कोणत्याही प्रकारची कपात न करता वितरित केली जावी असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.त्यात नगर परिषदेने 1 कोटी रुपयांचा स्वनिधी भरायचा आहे.या निधीमुळे नगरपरिषदेची नवीन इमारत अद्यावत होणार असल्याने अनेक अडचणी दूर होणार आहेत.

मात्र ही नवीन इमारत नक्की कुठे असणार? याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.कारण काही वर्षांपूर्वी आययुडीपी भागात नगरपालिकेची नवीन इमारत बांधण्यात आली आणि तेथे नगरपालिका प्रशासन स्थलांतरित केले जाणार होते.मात्र जनतेचा विरोध झाल्याने त्या इमारतीत फक्त वाचनालय सुरू करण्यात आले आणि नगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जुन्या इमारतीतच सुरू ठेवले होते.

जुन्या इमारतीच्या आजूबाजूला व्यापारी बाजारपेठ असल्याने विविध समस्या निर्माण होतात.त्यात विशेष करून पार्किंगची गैरसोय.त्यामुळे व्यापारी बाजारपेठेत रहदारीचे प्रश्न निर्माण होतात.

भविष्यकाळातील समस्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.मग ही अद्यावत इमारत शहरात होणार की आययूडीपी मध्येच? आणि मग मिळणाऱ्या सेवांसाठी जनतेला थेट आययूडीपी येथेच धाव घ्यावी लागेल.म्हणून ही नवीन इमारत शहरात मध्यवर्ती ठिकाणीच होईल की आययूडीपीमध्ये? याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असल्याचे दिसते.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *