वेगवान नाशिक/Nashik/,नाशिक,अविनाश पारखे,
मनमाड,नांदगाव –
महावितरण कंपनीने त्यांच्या कामाचा बोजा कमी करण्यासाठी प्रायव्हेट ठेकेदार नेमले.मात्र कंपनीने ठेकेदारांकडून वेळोवेळी योग्य तो मेन्टेनन्स करुन न घेतल्यामुळे,झाडांची छाटणी न केल्यामुळे प्रसंगी वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे.
सध्या राज्यभर 10 वी,12 वी च्या बोर्डाच्या परिक्षा सुरु आहेत.काल रात्री बेमोसमी पाऊस,वारा यामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडीत असल्याने विद्यार्थी व पालकांतर्फे संताप व्यक्त केला जात आहे.
वातावरण बदलामुळे घरोघरी व्हायरल इन्फेक्शनमुळे लहान मुले व वयोवृध्द नागरिक आजारी आहेत.अशी गंभीर परिस्थिती असतांनाही दिवसाला 4 तास ते 48 तासापर्यंत वीजपुरवठा खंडीत होतो.वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे फोनही नेहमी बंदच असतात. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन देखील स्विचऑफ असतात.
मात्र वीजबिल भरण्याबाबत महावितरणचे मेसेज न चुकता येतात.महावितरण कंपनीला खंडीत वीजपुरवठ्याचा फॉल्ट 48 तास काम करुनही सापडत नाही आणि सामान्य वीजग्राहकाचे 1 महिन्याचे बिल थकले की त्यांचे घर मात्र लगेच सापडते.
त्यामुळे सामान्य नागरिकांनी खंडीत विजपुरवठ्याबाबत कोणाकडे चौकशी करायची? कोणाशी चर्चा करायची? असे प्रश्न संतप्त नागरिकांतर्फे उपस्थित केले जात आहेत.
महावितरण कंपनीतर्फे सोशल मिडीयावर 4 तासाने लाईट येतील,काम सुरु आहे असे मेसेज पसरवून सामान्य नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.
महावितरण कंपनीने त्यांच्या बेजबाबदार व ढिसाळ कामात तात्काळ सुधारणा न केल्यास शहरातील सर्व वीज ग्राहकांना सोबत घेवून महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी महावितरण कंपनी प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असा तीव्र इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे देण्यात आला आहे.
निवेदनावर गणेश धात्रक,माधव शेलार,संतोष बळीद, संतोष जगताप आदींच्या सह्या आहेत.