मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम तरी करू नका


वेगवान नाशिक

बेळगाव : कर्नाटकातील राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दुसऱ्यांदा अनावरण करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी हा सोहळा घडवून आणला.

या सोहळ्याला महाराष्ट्रातील नेत्यांनी उपस्थित राहू नये. खासकरून संभाजी छत्रपती यांनी उपस्थित राहू नये, अशी विनंती सीमाभागातील जनतेने केली होती. मात्र, या विनंतीला न जुमानता संभाजी छत्रपती, आमदार सतेज पाटील आणि लातूरचे आमदार धीरज देशमुख यांनी उपस्थिती दर्शविली.

यावेळी धीरज देशमुख यांनी या कार्यक्रमात “जय कर्नाटक”चा नारा देत सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे.

रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी किल्ले राजहंसगड बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास हजर झाला. त्याबद्दल सीमावासियांच्या भावना इथे व्यक्त करीत आहे. मराठी भाषेसाठी गेली 66 वर्ष मराठी माणूस निरंतर लाठ्याकाठ्या झेलत संघर्ष करत आला आहे. अनेक लोकांनी जीवाचे बलिदान देऊन हा संघर्ष तेवत ठेवला. राजहंसगडावर शिवमूर्तीची जी प्रतिष्ठापना करण्यात आली त्या पाठीमागे आणि त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या पाठीमागे राजकीय पार्श्वभूमी होती. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने आपणास या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती केली होती. कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्या विरोधात मराठी माणसाने वेळोवेळी आंदोलने केली. प्रसंगी कारावासही भोगला.

त्या संघर्षाचा संदर्भ देत आपणास त्या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती करण्यात आली होती. आम्ही आजवर छत्रपतीच्या गादीचे वारस म्हणून तुम्ही आमच्या सोबत आहात असे मानत होतो. परंतु आमच्या ह्या समजाला तुम्ही हरताळ फासला आहे. तुमच्या उपस्थितीतच महाराष्ट्रातील आमदार धीरज देशमुख यांनी “जय कर्नाटक” असे उद्गार काढले. आपण छत्रपतीचे वारस म्हणवता तर मराठी विरोधी या घटनेचे आपण साक्षीदार होऊन सीमावासियांच्या आदरास पात्र ठरत आहात.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *