वेगवान
दरवर्षी सहसा होळीनंतर जाणवणारा उकाडा यंदा फेब्रुवारीतच जाणवण्यास सुरुवात झाली. परिणामी येणाऱ्या काळात परिस्थिती नेमकी किती वाईट असेल याच विचारानं सर्वजण हैराण आहेत. अशातच आता हवामान विभागाच्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यातील उन्हाच्या झळा कमी होत नाहीत तोच मार्च महिन्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा (Rain Predictions) इशारा देण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार रविवारी मुंबईत तापमान 36 अंशांपर्यंत पोहोचलं होतं. तर, पुण्यात तापमानानं 37 अंश इतका उच्चांकी आकडा गाठला होता. ज्यामागोमाग आता पुढील 4 दिवस राज्यातील काही भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 5 ते 7 मार्च या कालावधीत अहमदनगर, संभाजी नगर भागांमध्ये गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आलीय. तर, नाशिकमध्ये हवामान ढगाळ राहून काही भागांमध्ये पावसाची हजेरी असेल असंही सांगण्यात आलं आहे.
नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी बरसत आहे. सोमवारी पहाटेपासूनच नाशिक, निफाड, पिंपळगाव परिसरात पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसाचा फटका कांदा, द्राक्ष पिकालाही बरसताना दिसणार आहे. या संकटाचा धोका लक्षात घेऊन शेतक-यांनी वेळीच सावध राहण्याची गरज आहे.
सध्याच्या घडीला उत्तर गुजरात आणि त्यानजीक असणाऱ्या भागांमध्ये सध्या चक्रीवादळदृश परिस्थिती तयार झाली आहे. राजस्थानमध्ये याचेचच पडसाद दिसून येत आहेत. स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिमी हिमालय क्षेत्रामध्येही पावसाची हजेरी असणार आहे. सिक्कीमच्या बहुतांश भागातही तापमान अचानकच कमी होऊन हिमवृष्टी होणार आहे.