सुषमा अंधारेचे पती शिंदे गटात प्रवेश करणार


वेगवान नाशिक

ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ म्हणून अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना शिंदे गटाने मोठा झटका दिला आहे. सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

अंधारे यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. वाघमारे यांना शिंदे गटात मोठं पदही दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुषमा अंधारे या बॅकफूटवर जाव्यात म्हणून शिंदे गटाने ही मोठी खेळी केल्याचं सांगितलं जात आहे.

त्यामुळे अंधारे बॅकफूटवर जातात की अधिक आक्रमक होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांचा आज शिंदे गटात प्रवेश होणार आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात वैजनाथ वाघमारे यांचा प्रवेश होणार आहे. याच कार्यक्रमात अभिनेत्री दिपाली सय्यद यांचाही प्रवेश होणार आहे. मात्र, वाघमारे यांना प्रवेश देऊन शिंदे गटाने सुषमा अंधारे यांची डोकेदुखी वाढवल्याचं सांगितलं जात आहे.

सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने अंधारे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *