दिपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपमधूनच कडाडून विरोध


वेगवान नाशिक

प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली सय्यद या आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ठाण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मात्र, दिपाली सय्यद यांचा शिंदे गटातील प्रवेशाला भाजपनेच कडाडून विरोध केला आहे. भाजपच्या महिला आघाडीकडून हा विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे दिपाली सय्यद यांचा शिंदे गटात प्रवेश होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दिपाली सय्यद यांनी ठाकरे गटावर आगपाखड करत ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा केली. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून आपला लवकरच शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं दिपाली सय्यद यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आज त्यांचा ठाण्यातील एका कार्यक्रमात जाहीर प्रवेश होणार आहे. मात्र, या प्रवेशापूर्वीच भाजपने त्याला कडाडून विरोध केला आहे. एवढेच नव्हे तर भाजपने थेट दिपाली सय्यद यांची पात्रताच काढली आहे.

भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या मृणाल पेंडसे यांनी हा विरोध केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर अत्यंत वाईट भाषेत टीका केली होती. त्यामुळे त्यांनी मोदी आणि भाजपची जाहीर माफी मागावी, तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा, असं मृणाल पेंडसे यांनी सांगितलं.

मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या व्यक्तीला खरंतर प्रवेशच देऊ नये. आम्ही महिला आघाडीच्यावतीने सय्यद यांच्या पक्षप्रवेशाचा जाहीर विरोध करत आहोत, असंही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांचा आदर करतात. पण कोणतीही विचारधारा नसणारी, आपली मते सातत्याने बदलणारी, तसेच कुठली पात्रता नसलेल्या दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी वाचली.

महाविकास आघाडीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत दिपाली सय्यद यांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या दिपाली सय्यद यांना आमचा विरोध आहे, असं त्या म्हणाल्या.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *