डोळ्यात मिरचीची पूड फेकून व्यापाराचे २५ लाख रुपये लुटले; मध्यरात्री घडलेल्या घटनेनं खळबळ


वेगवान नाशिक

धुळे : राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातही चोरीच्या घटना तर मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

धुळ्यातून आता अशाच एका जबरी चोरीची घटना समोर आली आहे. धुळे शहरातील मध्यवर्ती परिसरात व्यापाऱ्याला लुटण्यात आलं असून त्याच्याकडून तब्बल २५ लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी परेश पटेल नामक व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली आणि २५ लाख रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. एकूण चार चोरट्यांनी मिळून ही सशस्त्र चोरी केली असल्याचे बोलले जात आहे.

ही घटना धुळे शहरातील निरामय हॉस्पिटलच्या मागे असलेल्या माधव कॉलनी परिसरात घडली.चोरट्यांनी रोकड लंपास करण्यासह परेश पटेल यांची दुचाकीही पळवून नेली. रात्रीच्या सुमारास लुटीची ही जबरी घटना घडल्याने धुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *