वेगवान नाशिक
पंचवटी : पंचवटी परिसरातील एका वैदिक विवाह संस्थेने एका हिंदू मुलीचा विवाह मुस्लिम तरुणाशी लावून दिल्याने संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी विवाह संस्थेच्या संचालकाच्या तोंडाला काळे फासत त्याला माफी मागायला लावल्याची घटना घडल्याने यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . या घटनेमुळे अशा प्रकारे विवाह नोंदणी करणाऱ्या विवाह संस्था चालकांचे धाबे दणाणले असून या घटनेबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
पंचवटी परिसरातील काळाराम मंदिराबाहेर असलेल्या श्री राम वैदिक विवाह या संस्थेने ८ सप्टेंबर रोजी अंबड लिंक रोडवर राहणाऱ्या एका तीस वर्षीय मुस्लीम तरुणाचे लग्न इगतपुरी तालुक्यातील अधरवड गावातील एका अठरा वर्षीय मुलीचा विवाह लावून दिल्याचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले . यामुळे संतप्त झालेल्या काही हिंदू कार्यकर्त्यांनी मंगळवार दि ८ रोजी रात्रीच्या सुमारास थेट श्री राम विवाह संस्थेचे कार्यालय गाठले . यावेळी याठिकाणी असलेले विवाह संस्थेचे संचालक उमेश उर्फ गिरीष अरविंद पुजारी यांना या विवाहाबद्दल जाब विचारण्यात आला .
यावेळी जमलेल्या काही संतप्त कार्यकर्त्यांनी उमेश उर्फ गिरीष अरविंद पुजारी यांच्या तोंडाला काळे फासत मारहाण केली तसेच,विवाह संस्थेच्या फलकावर चिखलफेक करीत घोषणाबाजी केली . यावेळी याठिकाणी उपस्थित असलेले पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला . त्यानंतर उमेश पुजारी यांनी हात जोडून माफी मागितल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना समज देत निघून गेले . घटनेनंतर उमेश उर्फ गिरीष अरविंद पुजारी ४९ रा. यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठून संशयित चंदन भास्करे,मुकुंद खोचे,शेळके यांच्याविरोधात मारहाण आणि तोंडाला काळे फासल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे .
चौकट : मंगळवारी कार्तिक पौर्णिमा असल्याने परिसरात असलेल्या कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविक गर्दी करीत असल्याने याठिकाणी पंचवटी पोलीस ठाण्याच्या वतीने अनेक अधिकारी आणि पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले होते . मात्र,इतक्या मोठ्या प्रमाणात गोंधळ होत असताना देखील उपस्थित पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे .
चौकट : पंचवटी परिसरात अशा प्रकारे आंतरजातीय विवाह लावून देणाऱ्या अनेक संस्था आहे . त्यामुळे मुली पळून जाऊन विवाह करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे . याठिकाणी विवाहानंतर मुलींचे नातेवाईक आपला संताप व्यक्त करताना दिसत असतात . मात्र,कायद्याच्या चौकटीमुळे या संस्थांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे .