वेगवान नाशिक / योगेश म्हाळणकर
सिन्नर:पाणी गरम करत असतांना अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याने पती-पत्नी गंभीर भाजल्याची घटना आज दि.७) सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास लक्ष्मीनारायण लॉन्सजवळील यशवंतनगरमध्ये घडली आहे…
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत जयश्री विक्रम आवारे (२८) व विक्रम किरण आवारे (३०) हे गंभीर भाजले असून त्यांना यशवंत हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघेही ७० टक्क्यापेक्षा जास्त भाजले असून त्याचवेळी घरातील दुसऱ्या खोलीत असणारा भावेश हा ४ वर्षीय बालक सुदैवाने बचावला आहे. त्याला कुठलीही इजा झालेली नाही.
विक्रम आवारे हे परिसरातच असणाऱ्या एका गॅस एजन्सीचे सिलेंडर ग्राहकांच्या घरी पोहचविण्याचे काम करतात. त्यांच्या घरात ही घटना घडली तेव्हा बाहेरच्या खोलीत ३५ सिलेंडरचा साठा आढळून आला आहे. त्यात २५ घरगुती वापराचे तर ७ व्यावसायिक वापराचे आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर महिला गंभीर भाजल्यानंतर तिला वाचवण्यासाठी गेलेला पतीही गंभीर भाजला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, त्यापूर्वीच विक्रम यांनी सिलेंडर तातडीने बाहेरच्या खोलीत फेकल्यामुळे आग आटोक्यात आली होती. तसेच शेजारच्या रहिवाशांनी तातडीने दोघांनाही यशवंत हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दोघेही ७० टक्क्यापेक्षा जास्त भाजल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. संदिप मोरे यांनी दिली. तर पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे यांच्यासह पोलीस घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून तहसिलदारांसह भारत गॅस कंपनीचे अधिकारीही घटनास्थळाकडे रवाना झाले होते.