मुंबईः सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वातील महाप्रबोधन यात्रा जळगावात ठिकठिकाणी फिरत आहे. ही प्रबोधन यात्रा आज मुक्ताईनगर येथे पोहोचली तेव्हा पोलिसांनी सुषमा यांच्या सभेला परवानगी नाकारली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुषमा अंधारे यांची सभा असलेल्या परिसरात महाआरतीच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं असल्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारली.
त्यानंतर बराच राजकीय गदारोळ झाला. अखेर सुषमा अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारल्यानंतर मुक्ताईनगरमध्ये खुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होईल, असं जिल्हा संपर्कप्रमुखांनी जाहीर केलंय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ठाण मांडून आहेत.
सुषमा अंधारे यांची मुक्ताईनगर येथील महाप्रबोधन सभेला परवानगी नाकारल्यानंतर आता उद्धव ठाकरेंची मुक्ताईनगरमध्ये सभा होणार आहे. शिवसेना नेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी याबाबत माहिती दिलीय.
मुक्ताईनगर येथील महाप्रबोधन सभेवरून जळगावातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान सभेला परवानगी नाकारल्यानंतर सभा घेण्याचा पवित्रा घेऊनही पोलिसांनी सुषमा अंधारे यांना नजरकैदेत ठेवलं.