नाशिक मध्ये मध्यरात्रीस मद्यधुंद चालकाने 10 जणांना चिरडले


वेगवान नाशिक

अमरधामरोड शितळादेवी परिसरात शुक्रवार (ता.२८) रात्री एक वाजेच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली. नानावलीच्या दिशेने जाणाऱ्या मद्यधुंद कारचालकाने अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना चारचाकीने धडक दिली. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सिडको येथील सिटी लिंक बस चालक मकरंद पंचाक्षरी(वय.२३) यांच्या अंत्यविधीसाठी अन्य कर्मचारी जुने नाशिक येथील अमरधाम येथे आले होते. अंत्यविधी संपन्न झाल्यावर यातील काही कर्मचारी अमरधाम बाहेरील रस्त्यावर उभे होते. आडगाव नाका दिशेकडून नानावलीकडे जाणाऱ्या चारचाकी एम एच ०५, ए एक्स ३९५७ ने रस्त्यावर उभे असलेल्या कर्मचाऱ्यांना समोरून जोरदार धडक दिली. शनिवार(ता.२८) रात्री एक वाजेच्या सुमारास घटना घडली.

यात अपघातग्रस्त चार चाकीचालक त्याचा सहकारी, सिटी लिंकचे कर्मचारी असे १२ जण जखमी झाले आहे. चारचाकी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती पोलीस कर्मचारी बब्बी इनामदार यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी पोलीस ठाण्यास याबाबत माहिती दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सपकाळे, कर्मचारी संदीप शेळके, लक्ष्मण ठेपणे, रवी जाधव, श्री. सरोदे श्री. चत्तर आदी घटनास्थळी दाखल झाले. रस्त्याने जाणाऱ्या एका खाजगी चारचाकीतून जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून तीन जणांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *