वेगवान नाशिक
मंबईः ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मागील काही दिवसांपासून सय्यद ह्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर त्यांनी भाष्य केलं आहे.
सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर दिपाली सय्यद ह्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर दिपाली सय्यद म्हणाल्या, शिवसेनेत सुषमा अंधारे आल्या म्हणून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. परंतु प्रत्येकजण आपलं काम करीत असतो. मी जे करतेय ते कामातून लोकांसमोर येत आहे.
यावेळी दिपाली सय्यद यांनी एक सूचक विधान केलं. ”आपण केवळ कृतीतून लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला नेता सपोर्ट करीत असेल तर आपण त्याबरोबर जायला हवं” असं त्या म्हणाल्या.
”मागील काही दिवसांपासून माझा आवाज मातोश्रीपर्यंत पोहोचत नाही. याबद्दल मी लवकरच बोलेन. मातोश्रीपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. परंतु मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तितकी मेहनत घ्यावी लागत नाही.” असंही दिपाली सय्यद म्हणाल्या. त्यामुळे त्या शिंदे गटात जाणार, असं दिसून येत आहे.