शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये संघर्षाची ठिणगी


वेगवान नाशिक

ठाकरे सरकारकडून राष्ट्रवादीला (ncp) बळ दिलं जात आहे. राष्ट्रवादीकडून शिवसेनेची (shivsena) कोंडी होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत युती नकोच, असं सांगत शिवसेनेच्या एका गटाने बंड केलं आणि सवता सुभा मांडला. ज्या राष्ट्रवादीच्या नावाने खडे फोडत शिवसेनेचा एक गट बाहेर पडला. तोच शिवसेनेचा एक गट आता राष्ट्रवादीला रेड कार्पेट टाकताना दिसत आहे. त्यावरून आता शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये धूसफूस सुरू झाली आहे.

शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी राष्ट्रवादीला जिल्ह्यात बळ दिल्याने शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील कमालीचे संतापले आहेत. मंत्री झाला म्हणून सरकार तुमची खासगी मालमत्ता नाही, अशा शब्दात चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटलांना सुनावले आहे.

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीला विकासकामे दिली. चिमणराव पाटील यांना न विचारता ही कामे दिली. तसेच या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याला स्वत: गुलाबराव पाटील आणि त्यांचे चिरंजीव उपस्थित होते. या कार्यक्रमातून चिमणराव पाटील यांना वगळण्यात आले. त्यामुळे चिमणराव पाटील कमालीचे संतप्त असून त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गुलाबराव पाटील यांची तक्रार केली आहे.

मला विश्वासात न घेता मतदारसंघातील कामे राष्ट्रवादीला दिली हे चुकीचंच आहे. त्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकार शंभर टक्के बंद करतील आणि कदाचित पुढे हे बंद होईल, असं चिमणराव पाटील म्हणाले.

माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादीला पाठबळ देण्याचा त्यांचा महान हेतू कशासाठी आहे त्यांनाच विचारा. माझ्यापेक्षा जनता जास्त बोलते. जनतेला जास्त कळतं, असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाची मला अपेक्षाही नाही. फक्त निमंत्रण मिळाल्यावर आमच्या पक्षाच्या लोकांनी त्यांच्या कार्यक्रमाला जाऊ नये एवढी अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याला गुलाबराव पाटील आणि त्यांचे चिरंजीव उपस्थित होते. पण तुम्हाला निमंत्रण नव्हतं. त्याविषयी विचारलं असता, त्याचा अर्थ आणि अन्वयार्थ जनतेने लावावा. या स्वयंस्पष्ट गोष्टी आहेत. त्यावर मी बोलण्याची गरज नाही. राजकारणातील अ ब क ज्याला कळतं त्यांना सर्व कळतं. त्यावर मी बोलणं बरं नाही. त्याची गरज नाही.

असं करण्यात त्यांचं चुकतं की नाही हे त्यांनी ठरवावं. उद्या मी मंत्री झालो असतो मी असं केलं असतं तर त्यांना चाललं असतं का? असा सवाल त्यांनी केला.

मला डावलून कामाची उद्घाटन केली जातात. मला न विचारता कामं दिली जातात हा राजकारणातला शुद्रपणा आहे. असं करू नये. एका सरकारमध्ये काम करतो. तेव्हा सरकारमध्ये प्रत्येकाचा वाटा असतो. एका एका मतावर सरकार येतं आणि जातं. वाजपेयींचं सरकार आपण पाहिलं आहे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *