वेेगवान नाशिक
नाशिक, नाशिक जिल्ह्याला पावसाने मागील चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात झोडपले आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक कांदा, मका असल्याने वेळोवेळी पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांसाठी धोक्याची परिस्थिती निर्माण केली आहे.
पावसाच्या अवेळी येण्याने शेतातील तयार माल घरापर्यंत आणणे कठीण झाले आहे. या पावसाने शेतकरी वर्गाची पिके पाण्यात गेली. यंदाच्या सततच्या अवकाळी पावसाने परिसरातील सरासरी उत्पन्नात घट होईल. या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे.
भाव वाढेल व आपला झालेला खर्च वजा करून थोडेफार पैसे पदरात पडतील. लेकरा बाळांची दिवाळी आनंदाने साजरी करू, या आशेने चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला आहे. गेल्या दोन- तीन दिवसांपासून पाऊस दररोज हजेरी लावत आहे.
शेतात काढणीसाठी उभा असलेला मका, बाजरी काढता येत नाही. काही ठिकाणी संपूर्ण शेतच पाण्याने उपळून निघाल्याने उभी पिके सडत आहेत. भविष्यात चाऱ्याचे दर वाढून शेतकऱ्यांना पशुपालन करणे अवघड होणार आहे. परिसरात टोमॅटो, कोबी, कांदा, मका, बाजरी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकरी वर्गाच्या डोळ्यात पाणी आणले आहे.