वेगवान नाशिक
मुंबई: यापुढे मुंबईत शिवसेनेचा (ठाकरे गट) एकही खासदार निवडून येणार नाही, अशी गर्जना करणारे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायम राणे यांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी खोचक शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. पुढचा खासदार निवडून येईपर्यंत नारायण राणे स्वतः भाजपमध्ये राहतील की नाही हाच प्रश्न आहे.
हा त्यांचा आतापर्यंतचा चौथा पक्ष आहे. प्रत्येकवेळी आमच्याबद्दल वाईट बोलायचं, हेच त्यांचे काम. त्यांच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. आम्ही कामांवर लक्ष देतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. ते शनिवारी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसंदर्भातही भाष्य केले. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका घेण्याची खोके सरकारची तयारी दिसत नाही.सध्या लोकप्रतिनिधी नसताना वेगवेगळी टेंडर आणि वेगवेगळी कामे होत आहेत. लोकशाहीत असे चालत नाही. प्रशासकाच्या जागी महापौर बसायला हव्यात आणि नगरसेवकांच्या पदावर लोकं बसायला हवीत. यासाठी निवडणुका होणे, गरजेचे आहे. लोकशाहीत जे काही होतंय, ते धोकादायक आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
तसेच आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावरही टीकास्त्र सोडले. कोस्टल रोड असेल, वरळी शिवडी कनेक्टड असेल किंवा इतर काम असतील, ही कामे आम्ही सुरू केलेली होती. आमची पद्धत अशी होती की, दररोज अपडेट यायची, आठवड्यात आढावा मिटींग व्हायची. या सरकारला कुठेही अश्या कामात रस दिसत नाही. काम कमी आणि राजकारणच जास्त सुरू आहे. जे काही राज्यात सुरू आहे, त्यानुसार शिवसेना फोडा, शिवसेनेला कमजोर करा, ठाकरे परिवाराला बाजूला करा, जे जे महाराष्ट्रासाठी आवाज उठवत आहेत त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न होतोय, असंच जर सुरू राहीले तर महाराष्ट्राचे ५ ते ६ तुकडे होतील, अशी भीती आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवली.