मुंबई : परतीच्या पावसाने राज्याला झोडपले असून विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासहित मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी पूर आल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.
शुक्रवारी राज्यात परतीच्या पुणे, मुंबई, ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. तर मराठवाडा विदर्भ आणि राज्यातील अनेक भागांत पावसाच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावून घेऊन दिवाळी कडू केली आहे. सोयाबीन पिक पूर्णत: पाण्याखाली गेले तर कापसाच्या वाती झाल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळालं. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या पिकाचे पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळणार का याकडे लक्ष असणार आहे.
येत्या ५ दिवसांत काही भागातून पावसाची माघार
राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होईल. २० ऑक्टोबरपर्यंत राज्यातून पाऊस माघार घेणार आहे तर दिवाळीच्या काळात राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासहित पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.